पनवेलमधील पाणीपुरवठा योजनेला गती देणार - लोणीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 05:09 AM2018-08-30T05:09:48+5:302018-08-30T05:10:33+5:30
मंत्रालयात बैठक : बबनराव लोणीकर यांचे आश्वासन
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना वेळेत व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी लोणीकर म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन जुन्या झाल्या असल्याने, पाणीगळतीचे प्रमाण वाढले आहे. गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी एका महिन्याच्या आत प्रयत्न केले जातील. पाणीपुरवठा योजनांना होणारा खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महानगरपालिकेच्या हद्दीत वेळीच व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा क्र मांक -३ तयार करण्यात आली असून, योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल, पनवेल म.न.पा.चे सभागृहनेते परेश ठाकूर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, पनवेल महानगरपालिकेचे व
पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आराखडे तयार
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अमृत योजनेतून सादर करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांच्या शहरी निकषाप्रमाणे दरडोई १३५ लिटर / दिन / माणसी या प्रमाणे सेवास्तर उंचविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची अंदाजपत्रके व आराखडे तयार करण्यात आले आहेत. ते नगर विकास विभागाला पाठविण्याच्या सूचनाही या वेळी लोणीकर यांनी दिल्या.