नवीन पुलाच्या कामाची गती मंदावली, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 02:17 AM2019-06-24T02:17:48+5:302019-06-24T02:18:17+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तालुक्यातील केवाळे, महालुंगी व चिपळे येथील पुलाची दुरुस्ती व नवीन पुलाचे काम सुरू आहे.
- मयूर तांबडे
पनवेल - सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तालुक्यातील केवाळे, महालुंगी व चिपळे येथील पुलाची दुरुस्ती व नवीन पुलाचे काम सुरू आहे; परंतु ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने पावसाळ्यात नागरिकांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने या पुलांचे काम पूर्ण करावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पनवेल तालुक्यातील चिपळे येथील जुन्या पुलाची डागडुजी तर केवाळे, व महालुंगी येथे नवीन पूल बांधण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही कामे सुरू आहेत. त्यातल्या त्यात मागील दोन तीन महिन्यांपासून या कामाची गती मंदावल्याचे दिसून आले आहे.
गाढी नदीवर हे नवीन पूल बांधण्यात येत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाने जोर धरल्यास परिसरातील रहिवाशांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. पुलाच्या कामाच्या मंद गतीमुळे रहिवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
चिपळे येथील पुलाच्या डागडुजीचे २३ लाख रु पये खर्च केले जाणार आहेत. हे काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत. हा पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. सध्या या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. गाढी नदीवर असलेल्या या पुलाला २00५ मध्ये आलेल्या पुराचा तडाखा बसला होता. त्यामुळे पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हा पूल चाळीस वर्षे जुना असल्याने त्याची पडझड झाली आहे. वाहतुकीला धोकादायक ठरलेल्या या पुलाच्या डागडुजीसाठी २३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार गेल्या वर्षी कामही सुरू करण्यात आले; परंतु आतापर्यंत ५0 टक्के काम सुद्धा पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम रखडल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. पावसाचा जोर वाढण्यापूर्वी पूल वाहतुकीला खुला न झाल्यास मोठ्याप्रमाणात गैरसोय होईल, असे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.
केवाळे व महालुंगी येथील नवीन पुलाचे काम सुद्धा कुर्मगतीने सुरू आहे. पुढील दोन तीन महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. केवाळे व महालुंगी येथील जुने पूल पाडून रहिवाशांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी नवीन पुलाला वळसा मारून नदीच्या पात्रातून प्रवास करावा लागत आहे. केवाळे येथील पूल गंजल्याने तो धोकादायक व अरु ंद बनला होता.
या भागात केवाळे, वाकडी, चिंचवली, उसर्ली, दुंदरे, मोरबे यांच्यासह आदिवासी वाड्यांचे प्रमाण अधिक आहे. हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी १ कोटी २ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्याचप्रमाणे महाळुंगी येथील पुलासाठी ५0 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
खाजगी जागेतून प्रवास
मोरबे गावातील रस्त्याच्या मोरीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना सहकार द्वारकाच्या खासगी जागेतून प्रवास करावा लागत आहे. मागील सात आठ महिन्यापासून या पुलांचे काम सुरू आहे; परंतु या कामाने अपेक्षित गती न घेतल्याने पावसाळ्यात या परिसरातील रहिवाशांना पुन्हा कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, यासंदर्भात वस्तुस्थितीची चौकशी करून माहिती दिली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सतीश श्रावगे यांनी सांगितले.