मुंबईतील मसाला मार्केटमध्ये अतिक्रमण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 01:58 AM2019-11-07T01:58:45+5:302019-11-07T01:59:12+5:30
गोडाऊन तीन फूट वाढविले : सार्वजनिक वापराची जागाही व्यापली : मंजुरीपेक्षा दुप्पट चटईक्षेत्राचा वापर
नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये सर्वाधिक अतिक्रमण झाले आहे. पोटमाळा व वाढीव एक मजल्याचे बांधकाम केल्यानंतर व्यापाऱ्यांनी आता गोडाऊन तीन फूट वाढविण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक वापराच्या जागेवरच अतिक्रमण केले असून मंजुरीपेक्षा दुप्पट चटईक्षेत्राचा वापर केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुर्भे परिसरामध्ये ७२ हेक्टर जमिनीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वसली आहे. सुनियोजितपणे मार्केटची उभारणी करण्यात आली होती; परंतु महानगरपालिका व बाजार समिती प्रशानाच्या दुर्लक्षामुळे काही मार्केटमधील व्यापाऱ्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. यामध्ये भाजी, फळ व मसाला मार्केटमध्ये सर्वाधिक अतिक्रमण झाले आहे. मसाला मार्केटमधील व्यापाºयांनी बाजार समितीकडे वाढीव एफएसआय मिळावा यासाठी मागणी केली होती. बाजारसमितीने वाढीव एफएसआय मंजूर केला आहे. सद्यस्थितीमध्ये ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे; परंतु व्यापाºयांनी मात्र महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता वाढीव बांधकाम केले आहे. या पूर्वी पोटमाळा व वाढीव एक मजल्याचे बांधकाम करण्यात आले होते. ९० टक्के गाळेधारकांनी पोटमोळे व वाढीव मजला बांधला आहे. आता व्यापाºयांनी गाळ्यांच्या समोरील जागेवर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. सी विंगमधील गाळेधारकांनी जवळपास तीन फूट वाढीव बांधकाम केले आहे. यामुळे दोन्ही गाळ्यांच्या मध्ये ग्राहकांना व कामगारांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. अनेक गाळेधारकांनी गाळ्यांच्या बाहेरून वरील मजल्यावर जाण्यासाठी दरवाजा केला असून जिन्याचे बांधकामही केले आहे. मूळ गोडाऊनच्या वरील दोन मजले भाड्याने दिले आहेत.
सी विंगप्रमाणे मसाला मार्केटमधील इतर विंगमध्येही व्यापाºयांनी वाढीव बांधकाम केले आहे. काहींनी तीन फूट तर काहींनी चार फूट ओटले वाढविले आहेत. वाढीव जागेमध्ये माल ठेवून त्यांची विक्री केली जात आहे. बाजार समिती किंवा महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामासाठीचे साहित्य मार्केटमध्ये आलेच कसे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मार्केटमध्ये देखभालीसाठी सुरक्षारक्षक व एपीएमसीचे कर्मचारी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम कसे करण्यात आले, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. व्यापाºयांच्या दबावामुळे कर्मचारी कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे. अशीच स्थिती राहिली तर मार्केटच्या दोन्ही विंगच्या मध्ये चालण्यास जागाही उपलब्ध
होणार नाही. मार्केटमध्ये आग लागली किंवा इतर काही दुर्घटना झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
एपीएमसी कर्मचाºयांकडूनही कारवाई नाही
च्बाजार समितीमधील सर्व व्यवहारावर एपीएमसी प्रशासनाचे नियंत्रण असते. पाचही मार्केटला संरक्षण भिंत आहे. परवानगीशिवाय कोणालाही मार्केटमध्ये कोणतेच साहित्य आणता येत नाही.
च्प्रत्येक गाळ्यांमधून सुरक्षारक्षक फेरी मारत असतात. यानंतरही मार्जिनल स्पेसमध्ये अतिक्रमण झालेच कसे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. देखभाल शाखेचे अधिकारी व कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करत आहेत.
२०१६ मध्ये झाली होती कारवाई
मसाला मार्केटमधील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने २०१६ मध्ये कारवाई केली होती. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जवळपास ३४ गाळे सिल केले होते. यानंतर अतिक्रमणावर कोणतीही कारवाई झालेली नाही. वाढीव मजल्यानंतर आता मार्जिनल स्पेसमधील जागेवर बांधकाम सुरू झाले असून ते थांबविण्याची मागणी होत आहे.
महापालिकेचे पूर्ण दुर्लक्ष : एपीएमसी मार्केटमधील बांधकामावर महानगरपालिकेचे नियंत्रण राहिलेले नाही. महापालिका प्रशासनाने कधीच येथील अतिक्रमण थांबविण्यासाठी ठोस भूमिका घेतलेली नाही. सुरू असलेले बांधकाम थांबविलेले नाही व झालेले बांधकाम पाडलेले नाही. यामुळे अतिक्रमण करण्याचे मनोबल वाढत असून दिवसेंदिवस अतिक्रमणांची संख्या वाढत आहे.