‘स्पायडरमॅन’ला आठ गुन्ह्यांत शिक्षा; रात्रीच्या वेळी भिंती, पाइपवर चढून करायचा चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 03:42 AM2020-01-14T03:42:40+5:302020-01-14T06:29:40+5:30
गुन्हे शाखेने केली होती अटक
नवी मुंबई : स्पायडरमॅनप्रमाणे भिंती व पाइपवर चढून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी दीड वर्षापूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून सुमारे पंधरा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. त्याच्यावर सुरू असलेल्या खटल्याच्या निकालावेळी न्यायालयाने त्याला ८ गुन्ह्यांत २१ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
गजानन मरिबा खिल्लारे (३५) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तो रात्रीच्या वेळी इमारतींच्या पाइपवर चढून घरांमध्ये घुसून चोरी करायचा. त्याशिवाय एका भिंतीवरून दुसºया भिंतीवर उडी मारून पसार होण्यातही तो तरबेज होता.
गुन्हे करण्यासाठी त्याच्याकडून वापरल्या जाणाºया स्पायडरमॅनसारख्या युक्तींमुळे पोलीसही चक्रावून गेले होते. त्याच्या मागावर नवी मुंबईसह पुणे पोलीस होते. तर यापूर्वीही त्याला पुणे पोलिसांनी अटक करून काही गुन्ह्यांमध्ये शिक्षा सुनावली होती. त्यानंतरही तो नवी मुंबई परिसरात गुन्हे करत होता. परंतु गुन्हा करून शिताफीने पळून जाण्यात तरबेज असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
अखेर दीड वर्षापूर्वी गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे उपनिरीक्षक अमित शेलार यांना त्याच्याविषयीची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक करण्यात आली होती. अधिक चौकशीत त्याने आठ गुन्ह्यांची कबुली दिली होती. त्यामध्ये खारघरचे पाच तर कळंबोलीचे तीन गुन्हे होते. त्याशिवाय त्याच्याकडून सुमारे पंधरा लाखांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी त्याच्यावर आठही गुन्ह्यांत पनवेल न्यायालयात खटला सुरू होता. त्याचा निकाल नुकताच लागला असून त्या आठही गुन्ह्यांत त्याला २१ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा लागली आहे. एकाच आरोपीला वेगवेगळ्या गुन्ह्यांत शिक्षा झाल्याची शहरातील ही पहिलीच घटना असल्याचीही शक्यता आहे.