नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सी.बी.डी. बेलापूर सेक्टर ३ येथील स्व. राजीव गांधी क्रीडा संकुलावर क्रिकेट मैदान तसेच नेरूळ सेक्टर १९ येथील कै. यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान खेळाडूंना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने मान्यता दिली असून या क्रीडा संकुलाचे बुकिंगही सुरू झाले आहे. अनेक महिन्यांनंतर क्रीडा संकुल खुले झाल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून नवी मुंबई महापालिकेचे क्रीडा संकुल आणि क्रीडांगण वापरासाठी बंद होते. शहरात कोरोना आटोक्यात आल्याने विविध सुविधा सुरू केल्या जात आहेत. पालिकेच्या स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुलावर शहरातील विविध स्पोर्ट्स क्लब, संस्था, शाळा, महाविद्यालये, कंपन्या, कार्यालये, क्रिकेट संघ आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर क्रिकेटचे सामने भरविले जातात. यासाठी क्रीडा संकुलाचे बुकिंग केले जाते. मार्च महिन्यात अचानक घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे नियोजित कार्यक्रम रद्द झाले होते. परंतु पालिकेने दोन दिवसांपूर्वी क्रीडा संकुल नेरूळ सेक्टर १० येथील कै. यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल मैदानाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शासनाच्या नियमांचे पालन करावेपुढील आठवड्याच्या काही दिवसांचे बुकिंगही सुरू झाले आहे. सद्य:स्थितीतील कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ही मैदाने सराव सामने, स्पर्धा व चित्रीकरणाकरिता खुली करण्यात आली असून शासनाने निश्चित करून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे.