शहरात क्रीडा सुविधांची वानवा; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 05:27 AM2018-10-11T05:27:01+5:302018-10-11T05:27:13+5:30
सुविधा नसल्याने वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या स्पर्धांचे नियोजन करताना पालिकेच्या क्रीडा विभागाला देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ४८ प्रकारच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भरविण्यात येतात. जिल्हास्तरीय स्पर्धा असल्याने या क्रीडा स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील सर्वच शाळांमधील विद्यार्थी सहभागी होतात; परंतु काही निवडक खेळ सोडल्यास इतर स्पर्धेच्या सुविधा महापालिकेकडे नसल्याने महापालिकेला या स्पर्धा घेण्यासाठी खासगी संस्था आणि खासगी शाळांची मदत घेऊन क्रीडा सुविधांचा वापर करावा लागत आहे. सुविधा नसल्याने वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या स्पर्धांचे नियोजन करताना पालिकेच्या क्रीडा विभागाला देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे.
क्रीडा क्षेत्रातील सुविधा देण्यास नवी मुंबई महापालिका मागे राहिली आहे. प्रत्येक शहरातील खेळाडूंना वाव मिळावा, यासाठी केंद्र शासनाच्या स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडिया या उपक्रमाअंतर्गत राज्य शासनाच्या क्र ीडा व युवक संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महापालिकेला जिल्हास्तरीय स्पर्धा खेळविण्याचा दर्जा दिला आहे. जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई शहरात २००८ सालापासून महानगरपालिका क्षेत्र जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. यावर्षी सुरू झालेल्या या स्पर्धेत विविध ४८ क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत; परंतु महापालिकेकडे क्रिकेट, कबड्डी आणि फुटबॉल या खेळांव्यतिरिक्त इतर स्पर्धा घेण्यासाठी आवश्यक सुविधा नाहीत. त्यामुळे नवी मुंबईतील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन, नेरु ळ जिमखाना, फादर अॅग्नेल स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल ऐरोली, टिळक कॉलेज नेरुळ, न्यू हॉरिजन पब्लिक स्कूल नेरु ळ आदी शाळा आणि खासगी संस्थांची मदत घ्यावी लागत लागत आहे. तसेच पालिकेच्या शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना इतर क्रीडा स्पर्धा शिकवल्या जात नसल्याने अनेक खेळाडू या स्पर्धांच्या प्रशिक्षणापासून वंचित राहत आहेत. नवी मुंबईतील खेळाडूंना कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स, व्हॉलिबॉल या स्पर्धांचे प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेने २०१२ साली ठरावदेखील मंजूर केले होते; परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या सुविधा होऊ शकलेल्या नाहीत. यामुळे शहरातील खेळाडूंना सरावासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणी जावे लागत आहे.
नवी मुंबई शहरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहेत; परंतु या सुविधा नसल्याने त्यांनादेखील सरावासाठी शहराबाहेर जावे लागत आहे. तसेच या खेळांच्या सुविधा पालिकेने निर्माण केल्या नसल्याने शहरातील पालिका शाळेत शिकणारे विद्यार्थी आणि आर्थिक परिस्थितीने गरीब खेळाडू या खेळांच्या प्रशिक्षणापासून वंचित राहत आहेत. पालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी क्रीडा विभागासाठी तरतूद करण्यात येते; परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे क्रीडा क्षेत्रात सुविधा निर्माण करण्यासाठी निधी वापरला जात नाही. सन २०१८-१९ च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात ५२ कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये क्रीडा संकुल बनविणे सात कोटी, तरण तलावासाठी सहा कोटी, मैदाने विकसित करण्यासाठी १७ कोटी, आंतरक्रीडा संकुल बांधण्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील खेळाडू घडविण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात क्र ीडासाठी ठेवण्यात आलेला निधी जास्तीत जास्त प्रमाणावर वापरण्यात येत आहे. ऐरोली येथे क्र ीडा संकुल बांधणीसाठी भूखंड मिळाला असून, त्या ठिकाणीदेखील लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. शहरात राहणाºया विद्यार्थी खेळाडूंना प्रशिक्षण देता यावे, यासाठी विविध वास्तूदेखील बांधण्यात येणार आहेत. पालिकेच्या माध्यमातून कबड्डी, खो-खो यांसारख्या काही खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
- नितीन काळे,
उपायुक्त क्र ीडा विभाग