नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गुणवंत खेळाडू घडावेत याकरिता खेळांची मैदाने विकसित करणे, अत्यावश्यक सेवा-सुविधांवर भर देणे, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यावर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात १२२ कोटींची तरतूद करून भर दिला आहे.
यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सानपाडा येथील उड्डाणपुलाखाली नागरिकांकरिता ज्याप्रमाणे बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, बॉक्स क्रिकेट पीच, रोलर स्केटिंग रिंग, आदी आवश्यकता लक्षात घेऊन बनविल्या आहेत, त्याच धर्तीवर कोपरखैरणे, सेक्टर १ ए महापे ब्रीजखाली तसेच नेरूळ येथील एल अँड टी ब्रीजखाली नागरिकांकरिता क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तरण तलाव सुविधा : से.१२ वाशी येथे इनडोअर स्टेडियम व बसस्थानक यांचे काम सुरू असून, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव उभारण्यात येत आहे. हे काम बहुतांशी पूर्ण झालेले असून, जून २०२४ पर्यंत लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे खेळाडूंना पोहण्याची दर्जेदार सुविधा मिळणार आहे. यामुळे खेळाडू घडण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.
घणसोलीत २८ एकरांचे क्रीडासंकुल : घणसोली, सेक्टर १३ मधील भूखंड क्रमांक १ येथे क्रीडासंकुल विकसित करण्याचे नियोजन असून, पहिल्या टप्प्यामध्ये जागेचे सपाटीकरण करणे, कुंपण भिंत बांधणे, प्रवेशद्वारे बांधणे, शौचालय बांधणे तसेच आवश्यकतेप्रमाणे वृक्षारोपण करणे आदी, कामे हाती घेण्यात येणार आहेत. येथील २८ एकरांमध्ये विविध प्रकारचे क्रीडाप्रकार सुरू करण्याचे नियोजन आहे.
कुस्तीचे मैदान : सानपाडा, सेक्टर ४ ए येथील मैदानात तसेच कोपरखैरणे, सेक्टर ४ ए येथील भूखंड क्रमांक १ वरील मैदानात कुस्ती आखाडा बांधण्याचे नियोजन येत्या वित्तीय वर्षामध्ये केले आहे.