महापालिका राबविणार क्रीडा प्रबोधिनी उपक्रम, महापौरांचे मनोगत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 01:51 AM2020-01-24T01:51:22+5:302020-01-24T01:51:39+5:30
नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा उपक्रम प्रोत्साहक आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा उपक्रम प्रोत्साहक आहे. गुणवंत खेळाडूंना विविध खेळांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा प्रबोधिनीसारखा अभिनव उपक्र म राबविण्याची संकल्पना असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले. आंतरशालेय क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
नवी मुंबई महापालिका शिक्षण विभाग आणि क्रीडा व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सी.बी.डी. बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात आंतरशालेय स्पर्धेला गुरु वारी सुरु वात झाली. या वेळी महापालिका शाळा क्र मांक ४९ ऐरोली येथील विद्यार्थ्यांच्या सुरेल स्वागतगीताने प्रारंभ झालेल्या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात सीबीडी येथील ज्ञानपुष्प विद्यानिकेतन येथील आर.एस.पी. विद्यार्थी तुकडीने शिस्तबद्ध रीतीने मार्चपास केले. कोपरखैरणे शाळा क्र मांक ३१ येथील विद्यार्थ्यांनी सबसे आगे होगे हिंदुस्थानी या गीताच्या धूनवर ह्युमन पिरॅमिड प्रात्यक्षिके करून स्वच्छता अभियानाचा झेंडा फडकवत स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये नवी मुंबई महानगरपालिका अग्रस्थानी राहील, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी उपायुक्त नितीन काळे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या शाळांतील चार हजारांहून अधिक विद्यार्थी या महापालिका स्तरावरील आंतरशालेय क्र ीडा स्पर्धेत सहभागी होत असल्याचे सांगत खो-खो, कबड्डी व क्रि केट या खेळांतील शालेय स्तरावरील संघांचे सामने केंद्रस्तरावर आयोजित करण्यात आले होते.
दहा केंद्रांतून सर्वोत्कृष्ट विजेते संघ या महापालिका स्तरावरील क्रीडा महोत्सवात खेळत असल्याची माहिती दिली. क्रीडा समिती सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी पालिका कटिबद्ध असल्याचे सांगत अधिकाधिक चांगले उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. घणसोली येथील महापालिका शाळा क्र मांक १०५ आणि सेक्टर ४ नेरुळ येथील नमुंमपा शाळा क्रमांक १०२ या दोन संघांमध्ये १७ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट सामन्यांचा शुभारंभ महापौर सुतार यांच्या हस्ते नाणेफेक करून करण्यात आला. क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांच्या समवेत सर्व खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेची सामूहिक शपथ ग्रहण केली. या वेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, सभागृहनेते रवींद्र इथापे, नगरसेविका अनिता मानवतकर, क्र ीडा अधिकारी रेवप्पा गुरव, आंतरराष्ट्रीय खो-खोपटू महाराष्ट्राचा कर्णधार योगेश मोरे आदी उपस्थित होते.