महापालिका राबविणार क्रीडा व्हिजन; नवी मुंबईतील मैदानांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:58 AM2019-08-07T02:58:27+5:302019-08-07T02:59:00+5:30

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न; ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवणार

Sports Vision to implement Municipal Corporation | महापालिका राबविणार क्रीडा व्हिजन; नवी मुंबईतील मैदानांचा विकास

महापालिका राबविणार क्रीडा व्हिजन; नवी मुंबईतील मैदानांचा विकास

Next

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : शहरातून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. मनपा क्षेत्रातील मैदानांचा विकास करण्यात येणार असून प्रत्येक खेळासाठी चांगले क्रीडांगण उपलब्ध करून दिले जाणार आहे. खेळाडूंना चांगल्या सुविधा देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेकडे सिडकोने आतापर्यंत ७३ मैदाने हस्तांतर केली आहेत. अजूनही मैदानांचे भूखंड महापालिकेला मिळणार आहेत. शहरात चांगले खेळाडू घडविण्यासाठी पोषक वातावरण आहे; परंतु अद्याप या विभागाकडे फारसे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नव्हते. मैदानाचे भूखंड असले तरी प्रत्यक्षात विविध खेळांसाठी आवश्यक सुविधा असलेली क्रीडांगणेच उपलब्ध नाहीत. पालिकेकडे राजीव गांधी व यशवंतराव चव्हाण मैदान दारावे ही दोनच चांगली मैदाने उपलब्ध आहेत. शहरात ४०० मीटर लांबीचा धावण्याचा ट्रॅक नाही, जलतरण तलाव, रायफल शूटिंग रेंज व इनडोअर खेळांसाठी महापालिकेची काहीही सुविधा नाही. परिणामी, शहरातील गुणवंत खेळाडूंना सरावासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. खेळाडूंची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी यापुढे क्रीडा व्हिजन राबविण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यापूर्वी महानगरपालिकेने स्कूल व्हिजन, उद्यान, तलाव व रोड व्हिजन राबवून हे प्रश्न सोडविले आहेत. व्हिजन या संकल्पनेमुळे शहरात चांगले रस्ते, शाळा, उद्याने उपलब्ध करून देण्यात यश आले आहे. याच धर्तीवर क्रीडा व्हिजन राबविले जाणार आहे.

या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शहर अभियंता, सर्व कार्यकारी अभियंता, क्रीडा उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांची बैठक बोलावली होती. बैठकीत शहरातील मैदानांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील खेळाडूंना आपल्या विभागात विविध क्र ीडा प्रकारचा सराव करता यावा तसेच शहरात नवीन खेळाडू घडण्यासाठी बॅडमिंटन, टेबल टेनिस, मार्शल आर्ट, बुद्धिबळ, कॅरम, शूटिंग रेंज, बॉक्सिंग, कुस्ती आदी खेळांसाठी आॅलिम्पिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इनडोअर मल्टिपर्पज हॉल बनविण्यात यावा यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या. तसेच ४०० मीटरचा सिंथेलिक ट्रॅक तयार करण्यासाठीही प्रस्ताव बनविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने प्रशासन कार्यवाही करीत असून यामुळे शहरातील मैदानांचा विकासदेखील होणार आहे. तसेच आॅलिम्पिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने खेळाडूंना दिलासा मिळणार असून महापालिकेच्या माध्यमातून विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने नवीन खेळाडूदेखील घडणार आहेत. विद्यमान आयुक्त अण्णासाहेब मिसाळ हेही क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक असून भविष्यात शहरात चांगली क्रीडांगणे विकसित होतील, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

फूटबॉलचे १५२ संघ
नवी मुंबईमध्ये फूटबॉल खेळणाºया खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सद्यस्थितीमध्ये शहरातील शाळांमधून ११८ मुलांचे व ३४ मुलींचे संघ आहेत. या मुलांना सराव करता यावा यासाठी महापालिकेने दारावेमध्ये मैदान विकसित केले आहे; परंतु या ठिकाणी पावसाळ्यात बसण्यासाठी सुविधा नसून बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणे प्रस्तावित आहे.

४०० मीटरच्या ट्रॅकची आवश्यकता
नवी मुंबईमध्ये अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु या खेळाडूंना सराव करण्यासाठी ४०० मीटर लांबीचा सिंथेटिक ट्रॅक नाही, यामुळे शहरातील खेळाडू मुंब्रा व मुंबईमध्ये जाऊन सराव करत आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक लवकरात लवकर उभारणे आवश्यक आहे.

जलतरण खेळाडूंचीही गैरसोय
शहरात महापालिकेचा एकही ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव नाही. महापालिकेला स्पर्धा घेण्यासाठी खासगी संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू आहेत. मात्र, सुविधा नसल्यामुळे त्यांना सरावासाठी इतर शहरांमध्ये जावे लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव उभारणे आवश्यक आहे.

शूटिंग रेंजची कमतरता नवी मुंबईमध्ये एकाच शाळेत शूटिंग रेंज आहे. शहरात अनेक खेळाडूंना रायफल शूटिंग खेळामध्ये करिअर करायचे आहे; परंतु सुविधाच नाहीत. ही सुविधा उपलब्ध करून दिल्यास चांगले खेळाडू घडविणे शक्य आहे.

क्रीडा धोरणाबाबत तत्कालीन आयुक्तांबरोबर आढावा घेण्यात आला होता. नवीन आयुक्तांनीही क्रीडा धोरणाबाबत सकारात्मक पावले उचललेली आहेत. शहरात सुसज्ज क्रीडा संकुल आणि सर्व खेळांचा त्यामध्ये समावेश असावा, या दृष्टीने प्लान करून सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील पालिकेच्या मैदानांवर खेळ प्रकारनिहाय कशा प्रकारे क्रीडा प्रबोधिनी करता येईल, तसेच क्रीडा संकुल याबाबत नियोजन केले जात आहे. याचा एकत्रित प्लान लवकरच सदर करण्यात येणार आहे.
- नितीन काळे, उपायुक्त, क्रीडा विभाग

Web Title: Sports Vision to implement Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.