बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेत धूर फवारणीच्या कामासाठी बोगस कागदपत्र जोडण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यासंदर्भातील तक्रारींची दखल न घेणाऱ्या तत्कालिन आरोग्य विभाग प्रमुखाविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलश वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तत्कालिन आरोग्य विभाग प्रमुखांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नगर परिषद कार्यालयात पोहचले. त्यानंतर त्यांनी नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर केले.
यावेळी कुळगाव बदलापूर नगर परिषदेत मागील तीन वर्षांपासून धूर फवारणीचे काम करत असलेल्या संस्थेने सादर केलेले ठाणे महानगर पालिकेचे अनुभव प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आले असून याबाबत शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींची तत्कालिन आरोग्य अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप शैलेश वडनेरे व अविनाश देशमुख यांनी केला. तत्कालिन आरोग्य अधिकाऱ्यांनी या तक्रारी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या नाहीत, असा ठपका मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनीही या प्रकरणाच्या सुनावणी अहवालात ठेवला आहे. त्याअनुषंगाने नगर परिषद प्रशासनाने याप्रकरणी तत्कालिन आरोग्य विभाग प्रमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वडनेरे व देशमुख यांनी केली. याप्रकरणी नगर परिषदेच्या टेंडर कमिटीचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. बदलापूरकरांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रकार असून यात नगर परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळें याप्रकरणी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी राष्ट्रवादीची मागणी असल्याचे अविनाश देशमुख व शैलेश वडनेरे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष सूर्यराव ,पप्पू भोईर ,अजय यादव, प्रिया खडके मनाली डिंगणकर, हनुमंत तुपे, कमलाकर भोईर, करण चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.