नवी मुंबई : एमआयडीसी क्षेत्रातील झोपड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे आता या झोपड्यांचा एसआरए योजनेच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाणार आहे. मंत्रालयात गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एसआरए योजनेला तत्वत: मान्यता दिली आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील एमआयडीसीतील ३८ हजार पात्र झोपड्यांच्याा विकासासाठी एसआरए योजनेला तत्वत: मान्यता दिली.
दिघा ते नेरूळ येथील शिवाजीनगर पर्यंत विस्तार असलेल्या या झोपड्यांचा पुनर्विकास दीर्घकाळ रखडला आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शिवसेनेचे (बाळासाहेब ठाकरे ) उपनेते विजय नाहटा आणि नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देऊन सामंत यांनी ही विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, एमआयडीसी आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी एमआयडीसीतील झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश संबधित विभागाला दिले. या सर्वेक्षणानंतर एसआरए योजनेची अंमलबजावणी केली जाईल, असे शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी स्पष्ट केले.