पनवेल : कळंबोली, सेक्टर ५मधील सेंट जोसेफ विद्यालयात सातवीतील विघ्नेश साळुंके याचा चार दिवसांपूर्वीच संशयास्पद मृत्यू झल्याच्या निषेधार्थ मंगळवारी शाळेवर मोर्चा काढण्यात आला. कोणतीही ठोस कारवाई केल्याबद्दल कळंबोली संघर्ष समिती व सर्वपक्षीयांच्या साथीने एल्गार करण्यात आला. कळंबोली वसाहतसुद्धा बंद ठेवण्यात आली होती.श्री स्वामी समर्थ मंदिर सेक्टर ६ येथून मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चा जोसेफ विद्यालयात आल्यानंतर पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते, शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, सिडको अधिकारी केवल चौधरी, मुख्याध्यापिका मीरा मुंटे व शाळा व्यवस्थापक आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी विघ्नेशच्या मृत्यूला शाळेचा ढिसाळ कारभारच कारणीभूत असल्याचा दावा करत मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी शाळेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात ते यशस्वी झाले नाहीत. यावेळी अनेक पालकांनी इतर विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल कैफियत मांडली. त्यामुळे लवकरच यासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच पोलिसांकडूनसुद्धा सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)
सेंट जोसेफ शाळेत एल्गार
By admin | Published: July 22, 2015 2:25 AM