नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटसमोरील सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. तबेलाही सुरू केला असून, भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यास सिडको प्रशासनाला अपयश आले आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील बाजूला व रेल्वे यार्डच्या मधील भूखंडावर मोठ्या प्रमाणात झोपड्यांचे बांधकाम केले आहे. झोपडीदादा पैसे घेऊन वीज व पाणीपुरवठा करत आहे. येथील सेक्टर १९ ए मधील भूखंड क्रमांक ७ हा मुख्य रोडला लागून आहे. कोट्यवधी रुपयांच्या भूखंडावर जवळपास ५० झोपड्या उभारल्या आहेत. तबेलाही सुरू केला आहे. सिडकाेने यापूर्वी अनेक वेळा येथील झोपड्यांवर कारवाई केली होती. भूखंडाला कुंपणही घातले होते, परंतु झोपड्या उभारणाऱ्यांनी कुंपण तोडून पुन्हा अतिक्रमण केले आहे. येथे यापूर्वी गांजा विक्रेत्यांनीही आश्रय घेतला होता. पोलिसांनी अनेक वेळा छापा टाकून गांजा हस्तगत केला आहे.सिडकोचे येथील भूखंडाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे वारंवार अतिक्रमण होत असून, त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. यामुळे लवकरात लवकर येथील झोपड्या हटविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
एपीएमसीजवळ सिडकोच्या भूखंडावर झोपड्यांसह तबेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 1:04 AM