एपीएमसीच्या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची रखडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:58 PM2019-01-27T23:58:30+5:302019-01-27T23:58:52+5:30

प्रशासनाच्या अपयशामुळे संस्थेचे नुकसान; १६० कोटींची कामे धिम्या गतीने, सहा वर्षांत दोनच प्रकल्प पूर्ण

Stacking of five ambitious projects of APMC | एपीएमसीच्या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची रखडपट्टी

एपीएमसीच्या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची रखडपट्टी

Next

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने संचालक मंडळ अस्तित्वात असताना १६० कोटी रुपये खर्चाच्या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे बांधकाम सुरू केले. सहा वर्षांमध्ये यामधील फक्त दोनच प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यात यश आले आहे. तीन प्रकल्पांचे काम धिम्या गतीने सुरू आहे. कामे वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश आल्यामुळे संस्थेचे नुकसान होऊ लागले आहे.

शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होऊ लागला आहे. २००७ पासून मॉडेल अ‍ॅक्ट, थेट पणन व साखरेसह अनेक महत्त्वाच्या वस्तू नियमनमुक्त करण्याच्या निर्णयामुळे संस्थेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाजार फीच्या माध्यमातून होणारे उत्पन्न कमी होऊ लागल्यामुळे या पूर्वीच्या संचालक मंडळाने दोन कोल्ड स्टोरेज, एक व्यापारी इमारत व दोन निर्यात भवन उभारण्याचा निर्णय घेतला होता. २०१२ मध्येच सुरू झालेल्या या कामांवर जवळपास १६० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. वास्तविक २०१५ पर्यंत यामधील सर्व प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक होते. धान्य मार्केटच्या समोरील बाजूला १७ कोटी रुपये खर्च करून निर्यात भवन बांधले आहे. हे बांधकाम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून, त्यामधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत; परंतु त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली नसल्यामुळे तो निर्णयही वादग्रस्त ठरला आहे. कांदा मार्केटला लागून ३० कोटी रुपये खर्च करून कोल्ड स्टोरेजची इमारत उभी केली आहे. हे बांधकामही वेळेत पूर्ण करता आलेले नाही. ५ जानेवारीला या बांधकामाला महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे.

एपीएमसीच्या फळ मार्केटमधील बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी नवीन विस्तारीत इमारत उभारण्याचे कामही सहा वर्षांपासून धिम्या गतीने सुरू आहे. सुरुवातीला २० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा खर्च वाढत जाऊन जवळपास ४८ कोटींवर गेला आहे. सद्यस्थितीमध्ये रंगरंगोटी व इतर किरकोळ कामे केली जात आहेत. नियोजनामध्ये झालेल्या चुकांमुळे मार्केट व्यापार करण्यासाठी योग्य नसल्याचे आक्षेप व्यापाºयांनी घेतल्यामुळे पुन्हा सुधारित कामे करण्यास सुरुवात केली आहे. अद्याप या मार्केटला भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. माथाडी भवनच्या समोरील एल मार्केटच्या मागील बाजूला नवीन बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे कामही धिम्या गतीने सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये हे काम अंतिम टप्प्यात असले तरी नक्की कधी पूर्ण होणार व भोगवटा प्रमाणपत्र कधी मिळणार, याविषयी काहीही स्पष्टता नाही.

न्यायालयाची परवानगी लागणार
कांदा मार्केटजवळील कोल्ड स्टोरेजचे बांधकाम पूर्ण झाले असून, ५ जानेवारीला भोगवटा प्रमाणपत्रही मिळाले आहे. बाजार समितीला धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे. यामुळे कोल्ड स्टोरेज भाडेतत्त्वावर देण्यासाठी बाजार समितीला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी बाजार समितीने यापूर्वीच अर्ज दाखल केला असून परवानगी मिळेपर्यंत त्याचा वापर करता येणार नाही.

बाजार समितीमधील एक कोल्ड स्टोरेज व निर्यातभवन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्रही मिळाले आहे. उर्वरित निर्यात भवन, फळ मार्केट इमारत व कोल्ड स्टोरेजचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. संपूर्ण काम लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- व्ही. बी. बिरादार, अधीक्षक अभियंता, बाजार समिती

Web Title: Stacking of five ambitious projects of APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.