आग प्रतिबंधक उपाययोजनांना हरताळ

By admin | Published: April 24, 2017 02:40 AM2017-04-24T02:40:58+5:302017-04-24T02:40:58+5:30

खारघरमधील आदित्य प्लॅनेट या बारा मजली इमारतीच्या तळमजल्यावरील शोरूमला लागलेल्या आगीत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

Staggering with fire prevention measures | आग प्रतिबंधक उपाययोजनांना हरताळ

आग प्रतिबंधक उपाययोजनांना हरताळ

Next

वैभव गायकर / पनवेल
खारघरमधील आदित्य प्लॅनेट या बारा मजली इमारतीच्या तळमजल्यावरील शोरूमला लागलेल्या आगीत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यात शोरूमचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे या इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणा बंद असल्याचे उघडकीस आले आहे. केवळ या दुर्घटनाग्रस्तच नव्हे, तर पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील बहुतांशी उंच इमारतीत आग प्रतिबंधक नियमांना हरताळ फासल्याचे दिसून आले आहे.
सहा महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेत सिडको नोडसह तळोजा एमआयडीसीचा समावेश आहे. सिडको नोडमध्ये बहुमजली इमारती उभारल्या आहेत. नियमानुसार प्रत्येक इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे असते. मात्र अनेक इमारतीत या नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. खारघर-कोपरा सेक्टर १0 येथील आदित्य प्लॅनेट या बारा मजली निवासी इमारतीच्या तळमजल्यावर गाड्यांचे मोठे शोरूम आहे. या शोरूमला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत दोन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर विक्रीसाठी ठेवलेल्या दहापेक्षा अधिक नवीन गाड्या भस्मसात झाल्या. आग विझविण्यासाठी तब्बल चार तासांचे शर्थीचे प्रयत्न करावे लागले. इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा आहे. परंतु ती कार्यरत नसल्याने आग विझविण्यासाठी अग्निशम दलाची प्रतीक्षा करावी लागली. या इमारतीत ६0 ते ७0 कुटुंब राहतात. आग वेळीच नियंत्रणात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. याची गंभीर दखल घेत संबंधित विभागाने या सोसायटीला नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सिडको नोडसह महापालिका क्षेत्रातील बहुमजली इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणांची झाडाझडती घेण्याचा निर्णय अग्निशमन विभागाने घेतला आहे. तसेच आदित्य प्लॅनेट सोसायटीतील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील विविध शोरूम्सना नोटिसा बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पनवेल महापालिकेची लोकसंख्या बारा लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत महापालिकेकडे सध्या असलेली अग्निशमन यंत्रणा तोकडी आहे. नगरपालिकेच्या काळात असलेली तीच यंत्रणा सध्या कार्यरत आहे. कळंबोली, नवीन पनवेल व खारघर येथे सिडकोने उभारलेल्या अग्निशमन दल आहेत, परंतु ते अद्यापि महापालिकेकडे हस्तांतरित झालेले नाहीत. तळोजा एमआयडीसीची स्वत:ची यंत्रणा आहे, परंतु ती सुध्दा सक्षम नसल्याचे विविध घटनांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एखादी आगीची दुर्घटना घडल्यास महापालिकेला सिडको किंवा नवी मुंबई महापालिकेवर विसंबून राहावे लागते. रविवारी आदित्य प्लॅनेट सोसायटीच्या तळमजल्यावरील शोरूमला लागलेली आग विझविण्यासाठी सर्वप्रथम नवी मुंबई महापालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पनवेल महापालिकेचे पथक आले. यावरून आगामी काळात आगीच्या दुर्घटनांचा सामना करण्यासाठी पनवेल महापालिकेला सक्षम यंत्रणा उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Staggering with fire prevention measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.