रखडलेले प्रकल्प उद्यापासून सुरू, सिडकोनेपही कंबर कसली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 11:44 PM2020-06-06T23:44:22+5:302020-06-06T23:45:04+5:30
सिडकोने कंबर कसली । लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याचा फायदा
नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे सिडकोचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठप्प पडले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, नेरूळ-उरण रेल्वेचा दुसरा टप्पा, खारघर ते आम्रमार्ग दरम्यान कोस्टल रोड आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मागील दोन-अडीच महिन्यांपासून खीळ बसली आहे. परंतु पाचव्या लॉकडाउनमध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आल्याने रखडलेल्या सर्व प्रकल्पांवर विशेष लक्ष देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी मेट्रोची चाचणी घेण्यात आली. उर्वरित कामे हाताबाहेर करून डिसेंबर २0२0 पर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याची सिडकोची योजना आहे. त्यानुसार लॉकडाउनमध्येही सोशल डिस्टन्सचे नियम पाळून प्रकल्पाचे काम सुरू ठेवले होते. यासाठी सुमारे २00 मजूर तैनात ठेवले होते. परंतु यातील अनेक मजुरांनी स्थलांतर केल्याने हे काम रखडले आहे.
शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मेट्रोच्या प्रकल्पाला मात्र मजूरवर्गाअभावी खीळ बसली आहे. संबंधित कंत्राटदारांना मजूर उपलब्ध करण्यास अपयश आल्याने सुरू केलेले हे काम पुन्हा बंद करण्याची नामुश्की सिडकोवर ओढावली होती. परंतु संबंधित कंत्राटदाराने आता हा प्रश्नसुद्धा निकाली काढल्याने लवकरच मेट्रोच्या कामालासुद्धा सुरुवात केली जाईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.
लॉकडाऊनमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामसुद्धा सुरू करण्यात आले होते. मात्र मजुरांअभावी हे कामसुद्धा बंद करावे लागले. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. पुरेसा मजूरवर्ग उपलब्ध करण्यातसुद्धा संबंधित कंत्राटदारांना यश आले आहे. त्यामुळे साधारण सोमवारपासून विमानतळासह मेट्रो, कोस्टल रोड आदींसह विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
सोमवारपासून शासकीय कार्यालयांत १५ टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची अनुमती मिळाली आहे. सध्या सिडकोच्या सर्व नागरी सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिडको कार्यालयात नागरिकांच्या भेटीगाठींना कात्री लागली आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या बळावर रखडलेल्या विकास प्रकल्पांना गती देणे शक्य असल्याचा विश्वास सिडकोच्या सूत्राने व्यक्त केला आहे.
1उरण : जेएनपीटी बल्क टर्मिनलने मे २०२० मध्ये एकूण ६,५०,९४२ मेट्रिक टन द्रवपदार्थाची हाताळणी केली आहे. मागील वर्षी मे २०१९ मध्ये ५,७४,६६४ मेट्रिक टन द्रवपदार्थाची हाताळणी केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी १३.३ टक्के वाढ झाली असल्याची माहिती जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.
2लॉकडाऊन कालावधीतही जेएनपीटी अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून निरंतर कार्यरत आहे. ३१ मे रोजी जेएनपीटीने ओएनजीसीचे ८६,४७७.९६९ मेट्रिक टन ‘क्रूड आॅइल’ बंदरातून लोडिंग केले आहे. जेएनपीटी नियमितपणे एलपीजी, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरीट, नेफ्था, क्रूड आॅइलसह विविध पेट्रोलियम पदार्थ बीपीसीएल लिक्विड कार्गो जेटीद्वारे हाताळणी करते.
3जेएनपीटीने कंटेनर हाताळणीमध्ये २,७४,७५० टीईयूचा व्यवसाय केला आहे. जेएनपीटीने मे २०१९ मध्ये ४२० कंटेनर ट्रेन्स हाताळल्या होत्या. तर या वर्षी मे २०२० या महिन्यात जेएनपीटीने ४४५ कंटेनर ट्रेन्स हाताळल्या आहेत. गेल्या वर्षी गुणांक १४.९१ टक्के होता. या वर्षी रेल्वे गुणांकामध्ये वाढ होऊन तो २३.७० टक्के झाला आहे.
4जेएनपीटी कंटेनर टर्मिनलने ६ मे २०२० पासून रिकाम्या कंटेनरची ट्रेन आयसीडी दहेजला पाठविण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. याच उपक्रमातून परत येताना हाजिरा येथून रिलायन्स इंडस्ट्रीजचा निर्यातीसाठीचा माल आणला जात आहे. यामध्ये दुहेरी फायदा होतो, अशी माहितीही जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.