नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान प्रशासनासह संचालकांसमाेर उभे राहिले आहे. बाजार समितीमध्ये प्रतिदिन २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल होते. प्रत्येक वर्षी सात हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते. परंतु शासनाचे बदललेले धोरण व नवीन कायदे यामुळे मार्केटमधील उलाढाल कमी होऊ लागली आहे.
बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्केटपुरते मर्यादित केल्यामुळे येथाल व्यापार एमआयडीसी व इतर ठिकाणी स्थलांतरित होत आहे. परिणामी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्या उत्पन्नावर परिणाम होत असून बाजार समितीचा महसूलही कमी होऊ लागला आहे. अशीच स्थिती राहिली तर समितीला कर्मचाऱ्यांचे वेतन देतानाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. फळ मार्केटमध्ये चार मजली नवे मार्केट उभारले आहे. या इमारतीचे नियोजन चुकले असल्यामुळे अद्याप बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही. पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही.