स्थायी समितीसाठी मोर्चेबांधणी सुरू, निवडणूक चुरशीची ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:23 AM2019-05-12T00:23:33+5:302019-05-12T00:23:42+5:30
महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
नवी मुंबई : महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अनेक नगरसेवक स्पर्धेमध्ये असताना काँग्रेसनेही सभापतीपदावर दावा केल्यामुळे राजकीय वर्र्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक यावेळी चुरशीची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे ८ व काँगे्रसचा एक सदस्य आहे. शिवसेनेचे ६ व भाजपचे १ सदस्य आहेत. आघाडीच्या मतांची संख्या ९ असल्यामुळे त्यांचा सभापती होऊ शकतो. परंतु काँगे्रसचे एक मत फुटले तर दोन्ही बाजूला समान ८ मते होऊ शकतात व चिठ्ठी काढून सभापती पदाचा निर्णय होऊ शकतो. काँग्रेसच्या सदस्या पूनम पाटील यांनी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन सभापतीपदावर दावा केला आहे. आघाडी करताना प्रत्येक समितीचे किमान एक वर्ष सभापतीपद देण्याचे मान्य करण्यात अले होते. यावेळी स्थायी समिती काँगे्रसला मिळावी, अशी मागणी केली आहे.
काँगे्रसच्या मतावर निवडणुकीचा निर्णय होणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमध्येही इच्छुकांची संख्या वाढली असून सभापतीपदासाठी माजी मंत्री गणेश नाईक कोणाच्या नावाला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.