विमानतळबाधितांच्या सार्वजनिक मंदिरांच्या बांधकामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:20 AM2018-10-31T00:20:05+5:302018-10-31T00:21:21+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना २२.५ टक्के व पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पॅकेजसोबत प्रकल्पबाधितांच्या गावांमधील सर्व मंदिरांसाठी सिडकोतर्फे भूखंड देण्यात आले आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना २२.५ टक्के व पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पॅकेजसोबत प्रकल्पबाधितांच्या गावांमधील सर्व मंदिरांसाठी सिडकोतर्फे भूखंड देण्यात आले आहेत. त्यातील वरचे ओवळे व कोल्ही गावांच्या मंदिरासाठी बांधकाम परवाने देण्यात आले असून या गावातील ग्रामस्थांनी मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे.
विमानतळ प्रकल्पबाधित दहा गावांच्या मागण्यांनुसार त्यांच्या गावांमधील सर्व मंदिरासाठी एक भूखंड देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दहा गावांपैकी ओवळे, कोल्ही, तरघर, चिंचपाडा, गणेशपुरी, उलवे व कोपर या गावांमधील मंदिरासाठी भाडेपट्टा करारनामा करण्यात आला आहे. सिडकोतर्फे गावातील मुख्य मंदिराच्या बांधकामासाठी एक कोटी देण्यात येणार असून भाडेपट्टा करार केल्यानंतर बांधकाम सुरू करण्यासाठी या निधीतील ५० लाख रुपये रक्कम आगाऊ देण्यात येणार आहेत. त्यानुसार वरचे ओवळे, तरघर, कोल्ही व कोपर गावांना ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. तर गणेशपुरी व उलवे गावातील मंदिरासाठी येत्या काही दिवसात ५० लाख देण्यात येतील. त्याचबरोबर प्रत्येक गावातील मुख्य मंदिरासाठी इतर मंदिराच्या बांधकामासाठी त्या मंदिरांचे मूल्यांकन करून त्यानुसार निधी देण्यात येणार आहे.
वरचे ओवळे व कोल्ही गावांतील मंदिर उभारणीसाठी बांधकाम परवाने मिळाले असून त्यांनी मंदिराच्या बांधकामास सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे उर्वरित गावांनी सुद्धा लवकरात लवकर मंदिरासाठीच्या बांधकाम परवान्यांची प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास सुरुवात करावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.