पनवेल : पालिका क्षेत्रातील सर्वांत मोठ्या खारघर नोडमध्ये केवळ तीन शासकीय केंद्रांवर कोविड लसीकरण केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांवरील वाढती गर्दी व शहरातील लोकसंख्येनुसार वाढते रुग्ण लक्षात घेता खाजगी रुग्णालयांत कोविड लसीकरण केंद्रे सुरू करण्याची मागणी खारघरचे नगरसेवक रामजी बेरा यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना शनिवार, ३ एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात केली आहे.बेरा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की पनवेल पालिकेने खाजगी व शासकीय रुग्णालयांत लसीकरणाला सुरुवात केली आहे. अद्यापपर्यंत ५० हजार लसीकरणाचा आकडादेखील पालिकेने पूर्ण केला आहे हे कौतुकास्पद आहे. मात्र शहरातील सर्वांत मोठा नोड म्हणून ओळखला जाणाऱ्या खारघर शहरात केवळ शासकीय केंद्रावर हे लसीकरण केले जात आहे. शहरात एकाही खाजगी रुग्णालयात लसीकरण सुरू नसल्याने सध्या शासकीय केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. ही गर्दी कोरोना प्रादुर्भावास कारणीभूतही ठरू शकते. खारघर शहरात टाटा एक्ट्रेक्ट सेंटर, येरळा मेडिकल आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण केले जात आहे. केवळ तीन शासकीय केंद्रांवर लसीकरण होत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रांगा लागत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनादेखील रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. या गोष्टींचा पालिकेने विचार करून खाजगी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात करण्याची गरज असल्याचे नगरसेवक बेरा यांचे म्हणणे आहे.४५च्या पुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे आता लसीकरण करण्यात येत असल्याने लसीकरणासाठी मोठी गर्दी वाढणार असल्याने पालिकेने तत्काळ उपाययोजना राबवून खारघर शहरात खाजगी रुग्णालयांत लसीकरण केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी बेरा यांनी आयुक्त देशमुख यांच्याकडे केली आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात लसीकरणाचे केंद्र वाढविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने महापालिकेने नियोजन करणे गरजेचे आहे.
खारघरमध्ये खाजगी रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 12:19 AM