पनवेल : पनवेलमध्ये नद्यांचे शुध्दीकरण व सुशोभीकरणाचे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तक्का येथील गाढी नदीच्या पात्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने गाढी नदीलगत परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला पडला.पनवेल परिसरातून वाहत असलेली गाढी, काळुंद्रे आणि कासाडी नदीचे पात्र दूषित झाले आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अतिक्र मणे सुध्दा झाली आहेत. नद्यांचे शुध्दीकरण व सुशोभीकरणाचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सामाजिक, निसर्गप्रेमी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवी योजनेच्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. कार्यक्रमास नगराध्यक्षा चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे, बांधकाम सभापती राजू सोनी, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. अभियानासंदर्भात २१ एप्रिलला संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन पुढील मोहीम हाती घेण्यात येणार आहे.तहसीलदार दीपक आकडे यांनी जलसाक्षरतेचा सामाजिक संदेश देणारी जलप्रतिज्ञा सर्वांना दिली. मुंबईच्या मिठी नदीची जशी दैना झाली तशी पनवेलच्या गाढी नदीची होऊ नये, यासाठी नदी शुध्दीकरण व सुशोभीकरणाचा संकल्प हाती घेण्यात आला असून, या संकल्पनेचा पनवेलकरांना फायदा मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास व्यक्त आकडे यांनी व्यक्त केला. गरज पडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे आकडे यांनी सांगितले. (वार्ताहर)
नदी शुद्धीकरण अभियान सुरू
By admin | Published: April 09, 2016 2:27 AM