रोह्यात वणव्याची मालिका सुरूच

By admin | Published: May 2, 2017 03:07 AM2017-05-02T03:07:20+5:302017-05-02T03:07:20+5:30

होळी सणापासून जंगल भागात लावल्या जाणाऱ्या वणव्यांची मालिका सुरूच असून, रोहे तालुक्यातील जंगल भागात रोज कुठे ना

Start the series of songs in Roha | रोह्यात वणव्याची मालिका सुरूच

रोह्यात वणव्याची मालिका सुरूच

Next

रोहा : होळी सणापासून जंगल भागात लावल्या जाणाऱ्या वणव्यांची मालिका सुरूच असून, रोहे तालुक्यातील जंगल भागात रोज कुठे ना कुठे तरी वणवे लागत असल्याने जंगल परिसर रात्रंदिवस धुमसत आहे. शनिवारी रात्री संभे येथील गावानजीकच्या जंगलात मोठा वणवा लागल्याने वनसंपत्तीची मात्र मोठी हानी झाली आहे.
एका बाजूला जंगल भागात लागणाऱ्या वणव्यांवर उपाययोजना करायची नाही, तर दुसऱ्या बाजूला पावसाळ्यात लाखो रुपये खर्च करून वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रम करायचे. आहेत तीच जंगले वाचविली तरी सध्या भेडसावणाऱ्या समस्या दूर होतील, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. केवळ वणवेच नाही, तर इतर अनेक घटक जंगल संपत्तीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत असताना याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. होळी सणाच्या प्रारंभापासून जंगल भागात वणव्यांना प्रारंभ झाला असून जंगल भागात लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे तालुक्यातील मेढे, खांब, सुकेळी, कोलाड, संभे, किल्ला, धाटाव विभागातील जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडू लागली आहेत. वणव्यामुळे वनस्पती जीवन व प्राणिजीवन यांची अपरिमित हानी होत असताना पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.
सरपण गोळा करणे, जंगलात दळी भाग तयार करणे, शिकार करणे, कोळशाची निर्मिती, जंगल भागातील इतर महत्त्वाची संपत्ती मिळविणे आदींसाठी जंगल भागात राजरोसपणे वणवे लावले जात आहेत. स्वत:च्या स्वार्थापोटी वणवे लावल्यामुळे जंगले नष्ट होत आहेत. परिणामी, जंगल व प्राणी संपत्तीची अपरिमित हानी होत आहे. वणवे लावणाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याने व कायद्याचे भय नसल्याने त्यांच्याकडून वारंवार अशाप्रकारचे कृत्य होताना दिसत आहे. वास्तविक पाहता वणवे लावणाऱ्यांना जोपर्यंत कडक शासन होत नाही, तोपर्यंत वणवे लावण्याच्या घटना या वारंवार होणारच, अशी प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त के ली जात आहे. (वार्ताहर)

वणव्यांमुळे औषधी वनस्पतींचे नुकसान

जंगल भागात लागणाऱ्या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलातील औषधी वनस्पती नष्ट होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. यामुळे या औषधी वनस्पती जतन करणे गरजेचे झाले आहे. यासाठी वन विभागाकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.
कोकणात राब भाजणीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो, यामुळे शेतकरी राब भाजत असतानादेखील जंगलात वणवे लागण्याचे प्रकार घडत आहेत.

जंगलामध्ये पूर्वीच्या काळी वणवे आपोआप लागायचे, मात्र आज वणवे लावले जात आहेत. यामुळे वनसंपत्तीबरोबरच प्राण्यांवरही परिणाम होत असून त्या वन्यप्राण्यांच्याही सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर येत आहे.

Web Title: Start the series of songs in Roha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.