लसीकरणारंभ; एकाच दिवसात ३१३ जणांना लस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 07:36 AM2021-01-17T07:36:37+5:302021-01-17T07:37:57+5:30
यावेळी डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष. डॉ. विजय पाटील यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असून लसीकरणाची जी प्रकिया सुरू झाली आहे ती देशाला आणि जगाला एक मार्ग दाखविण्याची प्रक्रिया ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात शनिवारी कोविड लसीकरणाला सुरुवात झाली असून, महापालिकेचे वाशी आणि ऐरोली येथील रुग्णालय, नेरूळमधील डी. वाय. पाटील रुग्णालय, तसेच बेलापूरमधील अपोलो रुग्णालय या चार लसीकरण केंद्रांवर प्रत्यक्षात लसीकरण सुरू झाले.
प्रत्येक केंद्रावर दररोज १०० जणांना लस दिली जाणार असून, येत्या काही दिवसांत केंद्रांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने ५० लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोविड १९ लसीकरणाला देशात प्रारंभ होत असून ही दिलासादायक गोष्ट आहे. १० महिन्यांपेक्षा अधिक काळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी या कोविड योद्ध्यांनी जो संघर्ष केला, तसेच लस शोधण्यासाठी ज्या शास्त्रज्ञांनी अखंड परिश्रम करून योगदान दिले त्या सर्वांचे आपण आभारी आहोत, असे मत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.
लसीकरण सुरू झाले म्हणजे कोरोना संपला, असा अतिआत्मविश्वास न बाळगता कोरोनाचा एकही रुग्ण नाही अशी स्थिती येईल तोपर्यंत मास्क, सुरक्षित अंतर आणि हात धुणे या कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त बांगर यांनी बेलापूर येथील अपोलो आणि नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील केंद्राला भेट दिली.
यावेळी डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष. डॉ. विजय पाटील यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असून लसीकरणाची जी प्रकिया सुरू झाली आहे ती देशाला आणि जगाला एक मार्ग दाखविण्याची प्रक्रिया ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
लसीकरणाच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली केंद्र येथे डॉ. वर्षा राठोड, सार्वजनिक रुग्णालय, वाशी केंद्र येथे डॉ. विजय येवले, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, नेरूळ केंद्र येथे डॉ. आनंद सुडे, आणि अपोलो हॉस्पिटल, बेलापूर केंद्र येथे वेंकटराम व्ही. या कोविड योद्ध्यांना पहिली लस देण्यात आली. नेरूळ येथील केंद्रावर आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. धनवंती घाडगे व वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारच्या कोविड वॅक्सिन मार्गदर्शक सुचना पाळण्यात आल्या.
मोबाइलवर येणार संदेश
कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचा मोबाइलवर संदेश प्राप्त होणार आहे. संदेश आल्यानंतर त्या दिवशी दिलेल्या केंद्रावर लसीकरणाला जाताना सोबत आपले आधार कार्ड असणे आवश्यक आहे. लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत याची नोंद घेण्यात यावी. लसीचा पुढील डोस कधी घ्यावयाचा याचादेखील संदेश मोबाईलवरूनच प्राप्त होणार आहे.
ही लस इतर लसींसारखीच आहे. कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. याचे साईड इफेक्ट वगैरे काही होतील का, याची काळजी करण्याची गरज नाही. मी स्वतः लस घेतली असून मला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. ही लस फार सुरक्षित असल्यामुळे सर्वांनी घ्यायला हवी
- डॉ. आनंद सुडे
अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेली लस उपलब्ध झालेली असून आधी आरोग्यसेवकांना मिळत असली तरी सामान्य नागरिकांसाठीही लवकरच उपलब्ध होणार आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
- डॉ. स्नेहल मल्लकमीर