नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा मुहूर्त हुकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 02:25 AM2019-08-14T02:25:16+5:302019-08-14T02:26:17+5:30

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिडकोच्या मेट्रो सेवेसाठी नवी मुंबईकरांना पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Starting of first phase of Navi Mumbai metro Will be late ? | नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा मुहूर्त हुकणार?

नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा मुहूर्त हुकणार?

Next

नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिडकोच्या मेट्रो सेवेसाठी नवी मुंबईकरांना पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, या वर्षी नोव्हेंबरपर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा चंग सिडकोच्या संबंधित विभागाने बांधला होता. त्यानुसार सध्या मेट्रोच्या ट्रॅकचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे; परंतु विविध कारणांमुळे स्थानकांचे काम रखडले आहे. त्यामुळे नोव्हेंबरचा मुहूर्त हुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बेलापूर ते पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम मागील सहा वर्षांपासून रखडले आहे. मात्र, वर्षभरापूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकेश चंद्र यांनी या रखडलेल्या कामाला गती दिली आहे. कंत्राटदारांचा निर्माण झालेला वाद संपुष्टात आणून सहा महिन्यांपूर्वी नवीन कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार मेट्रो रेल्वेसाठी तयार केलेल्या पुलावरून ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यावर नोव्हेंबर ते डिसेंबरच्या आधी चाचणी घेण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. मात्र, स्थानकांचे काम अद्यापि पूर्ण झालेले नाही, त्यामुळे ट्रॅक जोडणीचे काम रखडले आहे. याचा परिणाम म्हणून नियोजित चाचणीचा पूर्वनिर्धारित मुहूर्तही टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेपूर्वी मेट्रोची चाचणी घेण्याच्या हालचाली सिडकोने सुरू केल्या होत्या. मात्र, रेल्वेस्थानके एकमेकांना न जोडल्यामुळे ही चाचणी डिसेंबर २०१९ नंतर घ्यावी लागणार आहे. चाचणीचा अहवाल तपासल्यानंतर संबंधित प्राधिकरणातर्फे सिडकोला वेगाचे प्रमाणपत्र दिले जाते. तसेच त्यांच्या एका पथकाकडून पुन्हा मेट्रोची चाचणी घेतली जाते. ही चाचणी यशस्वी ठरल्यानंतर तो अहवाल रेल्वे सुरक्षा आयोगाकडे पाठवला जातो. या आयोगाकडून जेव्हा सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच मेट्रोची सेवा प्रवाशांसाठी खुली करता येणार आहे. या सर्व प्रक्रियेला सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मेट्रोचा प्रवास जुलै २०२० नंतरच शक्य होणार असल्याचा अंदाज सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.

 

Web Title: Starting of first phase of Navi Mumbai metro Will be late ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.