लसणाचा तोरा उतरण्यास सुरुवात, सढळ हाताने होऊद्या फोडणी; आवक वाढली
By नामदेव मोरे | Published: March 15, 2024 07:51 PM2024-03-15T19:51:17+5:302024-03-15T19:52:13+5:30
महागाईचा उच्चांक गाठलेल्या लसणाचा तोरा उतरण्यास सुरुवात झाली आहे.
नवी मुंबई: महागाईचा उच्चांक गाठलेल्या लसणाचा तोरा उतरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी २५० टन लसणाची आवक झाली आहे. एक महिन्यात बाजारभाव प्रतिकिलो २२० ते ३७० वरून ५० ते १६० रुपयांवर आले आहेत. निम्यापेक्षा दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. देशभर लसणाची टंचाई निर्माण झाल्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान देशभर बाजारभाव सातत्याने वाढू लागले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाचे दर २२० ते ३७० रुपये किलो झाले होते.
किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ४४० ते ७०० रुपये किलोपर्यंत पोहचले होते. जुन्या मालाचा साठा संपत आल्यामुळे व नवीन माल मार्केटमध्ये येण्यास विलंब झाल्याने प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. परंतु काही दिवसांपासून लसूणची आवक प्रचंड वाढू लागली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सरासरी २५० टन आवक होत आहे. आवक वाढल्याने दर घसरू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये प्रतिकिलो ५० ते १६० रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे. किरकोळ मार्केटमध्ये १०० ते २५० रुपये दराने लसणाची विक्री होत आहे. यापुढे लसणाचे दर अजून कमी होण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असून राज्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये दर घसरले आहेत.
राज्यातील बाजार समितीमधील लसूणचे दर
बाजार समिती - बाजारभाव
- मुंबई ५० ते १६०
- सोलापूर ८० ते १३०
- अकलुज ८० ते १००
- जळगाव ३० ते११०
- श्रीरामपूर ८० ते१५०
- राहता ८० ते १३०
- कल्याण १३० ते २१०
- अमरावती ५० ते १२०
- जळगाव ५० ते २००
- सांगली ५० ते १४०
- पुणे ५० ते १४०