नवी मुंबई : राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील अग्निशमन केंद्रामध्ये आयोजित अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. शहीद जवानांच्या शौर्याला आदरांजली व्यक्त करत शहीद स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली व्यक्त करण्यात आली. अग्निशमन दिनाचे औचित्य साधून पुढील आठवडाभर अग्निशमन सप्ताह साजरा करण्यात येत असून, नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. सप्ताहांतर्गत शनिवारी बेलापूर परिसरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहराची वाढती लोकसंख्या व उंच इमारतींची संख्या लक्षात घेऊन अत्याधुनिक साधनसामुग्री व वाहने घेऊन, तसेच कर्मचारी संख्या वाढवून अग्निशमन दल अधिक सक्षम करण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल, अशी प्रतिक्रिया महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केली. अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त सोमवार, १७ एप्रिलला डी. वाय. पाटील रुग्णालयाजवळ अग्निशमन विषयक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, १८ एप्रिलला बेलापूर येथे भारतीय कपास भवनजवळ अग्निशमन विषयक प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. तर बुधवार, १९ एप्रिलला कोपरखैरणेतील स्त्री मुक्ती संघटना वसतिगृहाजवळ प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. गुरुवार, २० एप्रिलला एमएसईसीडीसी सबस्टेशन, ऐरोलीजवळ अग्निशमन विषयक प्रात्यक्षिकांचे आयोजन केले असून सप्ताहांतर्गत महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
वाशीत अग्निशमन सेवा सप्ताह सुरू
By admin | Published: April 17, 2017 4:21 AM