पनवेल : आठवडाभरात काळुंद्रे-शिवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला जाणार, असे आश्वासन एमएमआरडीए प्रशासनाकडून मिळाल्यानंतर शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा आपले उपोषण मागे घेतले. मागील अनेक दिवसांपासून रस्त्याला मंजुरी मिळूनही काम रखडल्याने एमएमआरडीए प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करीत उपोषण सुरू करण्यात आले होते.
शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे यांच्यासोबत सखाराम पाटील व नरेश भगत हेदेखील उपोषणाला बसले होते. मंजुरी मिळूनदेखील रस्त्याचे काम करण्यात येत नव्हते. त्यामुळे मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठी गैरसोय होत होती. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालवताना त्यांना कसरत करावी लागायची, यामुळे वाहनेही नादुरुस्त होत होती. शिवाय मानेचे, पाठीचे, कंबरेचे आजारही बळावल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये केल्या होत्या.
शिवकर-काळुंद्रे रस्त्याचे काम एमएमआरडीएच्या अंतर्गत येत असल्याने शिवकर ग्रामस्थांनी वारंवार एमएमआरडीए प्रशासनासोबत पत्रव्यवहार केले होते. त्या पत्राची दखल घेतली जात नसल्याने सरपंच ढवळे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. उपोषणाने एमएमआरडीए प्रशासनाला जाग आली असून, आठवडाभरात रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. एमएमआरडीएचे अभियंता लोकेश चौसष्ठे यांनी या वेळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण सोडविले. पनवेलचे नायब तहसीलदार एन. टी. आदमाने यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली.