नवी मुंबई : ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सिडकोने खारघर नोडची निर्मिती केली आहे. या नोडमध्ये आजमितीस आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स व सेंट्रल पार्कची निर्मिती करण्यात आली आहे, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन पार्क व कार्पोरेट पार्क प्रस्तावित करण्यात आले आहे. आता यात अत्याधुनिक दर्जाच्या सांस्कृतिक संकुलाची भर पडणार आहे. खारघर येथील उत्सव चौक परिसरातील सुमारे अडीच हेक्टर जागेवर हे सांस्कृतिक संकुल प्रस्तावित करण्यात आले आहे. सिडकोच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पॅरीस येथील लुवर म्युझियम व लंडन येथील ब्रिटिश म्युझियमच्या धर्तीवर जगभरातील पर्यटकांसाठी हे केंद्र आकर्षण ठरेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.प्रस्ताविक सांस्कृतिक संकुल हे सध्या प्राथमिक स्तरावर आहे. त्याला सिडकोच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. या संकुलात कलादालन, वस्तुसंग्रहालय आणि कलाकेंद्राचा समावेश असणार आहे. या सांस्कृतिक संकुल व त्यातील विविध दालनांमुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. हे सांस्कृतिक संकुल दोन टप्प्यात विकसित करण्याची योजना आहे. पहिल्या टप्प्यात कलादालन वस्तुसंग्रहालय, तर दुसऱ्या टप्प्यात कलाकेंद्र विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. भारती विद्यापीठ ते उत्सव चौक या पांडवकड्याकडे जाणाऱ्या मार्गाच्या उत्तरेस उच्चदाबाची विद्युत वाहिनी आहे. ही विद्युत वाहिनी भूमिगत केल्यानंतर उपलब्ध होणाºया २.५ हेक्टर जागेवर हे सांस्कृतिक संकुल उभारण्याची योजना आहे. या प्रस्तावित संकुलाच्या कार्यान्वयन अणि देखभालीसाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्थांची नेमणूक करण्यास सिडकोच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. वस्तुसंग्रहालयासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, कलादालनासाठी नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट (मुंबई) आणि कला केंद्रासाठी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (मुंबई) या संस्थांनी सध्या या संकुलाच्या कार्यान्वयन आणि देखभालीसाठी रुची दाखविली आहे, तसेच कलाकेंद्र आणि कलादालनासाठी अनुक्रमे नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (दिल्ली) आणि ललित कलाकेंद्र (पुणे) यांची नेमणूक करण्याबाबत शक्यता पडताळून पाहिली जात असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
खारघरमध्ये उभारणार अत्याधुनिक दर्जाचे सांस्कृतिक संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:28 PM