नवी मुंबई : सिडकोच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक दर्जाचे चार फायर इंजिन दाखल झाले आहेत. स्वातंत्र्य दिनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते या फायर इंजिनचे लोकार्पण करण्यात आले.सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात आवश्यकतेनुसार अग्निशमन केंद्र उभारली आहेत. नवी मुंबईच्या कोणत्याही विभागात आगीची मोठी दुर्घटना घडल्यास सिडकोच्या अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागले. त्यामुळे हा विभाग अधिकाधिक सक्षम करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला आहे. त्यानुसार सध्या चार अत्याधुनिक फायर इंजिनचे लोकार्पण करण्यात आले आहे. येत्या काळात अग्निशमन दलात दोन वॉटर टँकर व बाविसाव्या मजल्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता असलेली ७० मीटरची शिडी (एरियल लँडर) दाखल होणार असल्याचे लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अग्निशमन दलातील जवानांना १३५ फायर सूटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे, मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोळी आदीसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिडकोच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक फायर इंजिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:44 AM