लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : कोरोनाचे भय कायम असतानाच आता ‘बर्ड फ्लू’च्या साथीने डोके वर काढले आहे; परंतु राज्य सरकारला याचे कोणतेही गांभीर्य नाही, याबाबत सरकार उदासीन असल्याची टीका माजी मंत्री तथा भाजपचे नवी मुंबई विभागाचे निरीक्षक आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
भाजपच्या नवी मुंबई प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आशिष शेलार यांनी बुधवारी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपस्थित भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे स्थानिक नेते, माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक स्तरावर चर्चा करायला आपण येथे आल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. नवी मुंबई भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. कारण भाजपमध्ये या गोष्टींना थारा नाही. नवी मुंबईमध्ये भाजपची ताकद मोठी आहे. आम्ही विरोधी पक्षांशी दोन हात करायला तयार आहोत. कारण गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि रमेश पाटील यांच्या रूपाने नवी मुंबईत आमचे तीन सक्षम आमदार आहेत. शिवाय संघटन करणारे कार्यकर्ते जोरदार काम करीत असल्याचे शेलार यांनी सांगितले.याप्रसंगी नवी मुंबई प्रभारी संजय उपाध्याय, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, दीपक पवार, सुनील पाटील, काशीनाथ पाटील, जिल्हा महामंत्री नीलेश म्हात्रे, विजय घाटे, दत्ता घंगाळे, विकास सोरटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.