नमस्ते योजनेच्या विशेष शिबिराचा नवी मुंबई महापालिकेत राज्यस्तरीय शुभारंभ

By योगेश पिंगळे | Published: January 4, 2024 06:08 PM2024-01-04T18:08:17+5:302024-01-04T18:08:42+5:30

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय तसेच गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने यांत्रिकी ...

State level launch of special camp of Namaste Yojana in Navi Mumbai Municipal Corporation | नमस्ते योजनेच्या विशेष शिबिराचा नवी मुंबई महापालिकेत राज्यस्तरीय शुभारंभ

नमस्ते योजनेच्या विशेष शिबिराचा नवी मुंबई महापालिकेत राज्यस्तरीय शुभारंभ

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय तसेच गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने यांत्रिकी स्वच्छ पर्यावरण प्रणाली उपक्रम राबविला जात आहे. सफाईमित्रांकरिता राबविण्यात येणा-या या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत ‘नमस्ते योजनेकरिता वैयक्तिक माहिती शिबीर उपक्रमाचा महाराष्ट्र राज्यस्तरीय शुभारंभ नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाला.

मलनि:स्सारण व्यवस्थापनाचे काम करणा-या सफाईमित्रांना बदलत्या तंत्रज्ञानाचे अद्ययावत प्रशिक्षण देणे, त्यांच्यातील उद्योजकता वाढीसाठी प्रोत्साहन देणे, त्याकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे तसेच त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबाचे आरोग्य सुरक्षित करणे व त्यांना विमा योजनांचा लाभ देणे अशा विविध गोष्टींचा लाभ सफाईमित्रांना पुरविण्याच्या दृष्टीने नमस्ते योजनेचे हे शिबीर विशेष महत्वाचे असल्याचे योजनेच्या राज्य समन्वयक प्रियंका गांगुर्डे यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेचे काम चांगले असल्यामुळेच या योजनेचा शुभारंभ नवी मुंबई महानगरपालिकेपासून होत असल्याची माहिती त्यांनी दिली. नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व सफाईमित्रांना विविध लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांची वैयक्तिक माहिती नमस्ते योजनेच्या विशेष ॲपवर नोंदीत असणे आवश्यक असून त्याकरिता प्रत्येक सफाईमित्राने आपली सत्य व संपूर्ण माहिती दयावी असे सूचित करीत शहर अभियंता संजय देसाई यांनी या योजनेचा लाभ प्रत्येक सफाईमित्राने घ्यावा असे आवाहन केले. नमस्ते योजनेच्या शुभारंभासाठी राज्य शासनाने नवी मुंबई महानगरपालिकेची निवड केली त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करीत शासनाचे आभार मानले.

अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी केंद्र सरकारने याबाबतचा कायदा करण्याच्या आधीपासूनच नवी मुंबई महापालिका यांत्रिकी पद्धतीने सफाई करत असल्याची माहिती देत नमस्ते योजनेमधून सफाईमित्रांचा तयार होणारा केंद्रीय पातळी वरील डाटा बेस त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल असे सांगितले. महापालिकेकडे २७२ सफाईमित्र असून नमस्ते योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५३ सफाईमित्रांचा पोर्टफोलिओ तयार केला जाणार आहे. नमस्ते योजनेच्या माध्यमातून सफाईमित्रांचे सक्षमीकरण केले जात असून यामध्ये प्रत्येक सफाईमित्राने सहभागी होत आपली नोंदणी करुन घ्यावी व नवी मुंबई महानगरपालिकेपासून या शिबीराचा शुभारंभ होत असल्याने एक चांगला आदर्श इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर ठेवावा असे आवाहन राज्य शासनाचे प्रतिनिधी व नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी मलनि:स्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुधाकर मोरे तसेच नमस्ते योजनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सोपान कदम आदी उपस्थित होते.

Web Title: State level launch of special camp of Namaste Yojana in Navi Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.