खारघरमधील सेंट्रल पार्कची दुरावस्था; थीम पार्क आणि फुड कोर्ट बनले खंडर 

By वैभव गायकर | Published: February 11, 2024 04:08 PM2024-02-11T16:08:05+5:302024-02-11T16:10:24+5:30

विश्रांतीसाठीच्या स्मार्ट हटचे खंडरात रूपांतर झाले असल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

State of Central Park in Kharghar; Theme parks and food courts turned into ruins | खारघरमधील सेंट्रल पार्कची दुरावस्था; थीम पार्क आणि फुड कोर्ट बनले खंडर 

खारघरमधील सेंट्रल पार्कची दुरावस्था; थीम पार्क आणि फुड कोर्ट बनले खंडर 

पनवेल: लंडनच्या हाइडपार्कच्या धर्तीवर खारघरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्याची घोषणा सिडकोने केली होती. 100 कोटी खर्च करून 2010 मध्ये पहिला टप्पा पूर्ण केला होता; परंतु 14  वर्षांत उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. लोकसंगीताची माहिती देणाऱ्या थीम पार्कमधील कलाकृतींची तोडफोड झाली आहे. कारंजे बंद आहेत. विश्रांतीसाठीच्या स्मार्ट हटचे खंडरात रूपांतर झाले असल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
        
देशातील सर्वात श्रीमंत महामंडळ अशी ओळख असणारी सिडको भव्य प्रकल्पांची घोषणा करते; परंतु प्रत्यक्षात नागरिकांच्या हिताचे प्रकल्प पूर्ण करत नाही. खारघरमधील सेंट्रल पार्कचीही अशीच स्थिती झाली आहे. येथील 290 एकर जागेवर लंडनमधील हाइडपार्कच्या धर्तीवर भव्य उद्यान बनविण्याचा संकल्प करण्यात आला होता. 25 जानेवारी 2010 मध्ये यामधील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय संस्कृतीची ओळख होईल 

अशाप्रकारे उद्यानाची रचना केली होती. उद्यानाच्या सुरुवातीलाच पखवाज, पेटी,ढोलकी व इतर वाद्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. अ‍ॅम्पी थिएटरच्या बाजूला नागरिकांना बसता यावे यासाठी स्मार्ट हट ही संकल्पना राबवून निवारा केंद्र तयार केली होती. भारतीय संगीत कलेतील कथ्थक, भरतनाट्यम व इतर सर्व नृत्यांची ओळख व्हावी अशाप्रकारचे थीम पार्क तयार केले होते. उद्यानात आवश्यक त्या ठिकाणी प्रशस्त फूडकोर्ट, प्रसाधनगृहांची रचना केली होती.परंतु हे फूड कोर्ट चालुच झाले नसल्याने सिडकोची आंतराष्ट्रीय सेंट्रल पार्कची संकल्पना केवळ नावालाच आहे का काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

14 वर्षांमध्ये एकही फूडकोर्ट सुरू होऊ शकले नाही.त्यामुळे सेंट्रल पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ अनधिकृत फेरीवाल्यांनी आपला बस्तान मांडला आहे.पर्यटकांना या फेरीवाल्यावर अवलंबून रहावे लागत आहे.प्रवेशद्वारावरील एकच प्रसाधनगृह सुरू ठेवण्यात आले आहे.सुरुवातीच्या काळात 100 कोटी आणि त्यानंतर पुन्हा शेकडो कोटी खर्चून सिडको पांढरा हत्ती पोसत तर आहे मात्र पार्कच्या देखरेखीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.
      
उद्यानाची अवस्था पाहिल्यानंतर नागरिक सिडकोच्या कार्यक्षमतेवरच टीका करू लागले आहेत. सिडको घोषणा करते; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाही. प्रत्यक्षात पहिला टप्पा नियोजनाप्रमाणे कार्यान्वित करता आलेला नाही. सिडकोचे नियोजन पूर्णपणे फसले असून उद्यान निर्मितीवर केलेला खर्च व्यर्थ गेला आहे.सेंट्रल पार्कच्या देखरेदिखीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे.याबाबत सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातंबे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

प्रवेशद्वाराजवळ फेरीवाल्यांचे बस्तान
सेंट्रल पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ फेरीवाल्यांनी बस्तान मांडला आहे.या अनधिकृत फेरीवाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असुन देखील सिडको अथवा पालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

बेशिस्त पर्यटक देखील जबाबदार 
सेंट्रल पार्क सारख्या उद्यानात सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक येत असतात. यापैकी काही पर्यटक बेशिस्त वर्तणूक करीत पार्कातील वास्तूंचे नुकसान करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे अशा पर्यटकांवर देखील कारवाईची गरज आहे.

Web Title: State of Central Park in Kharghar; Theme parks and food courts turned into ruins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.