नवी मुंबई : सिडकोने बामणडोंगरी गृहप्रकल्पातील घरांच्या किमती सहा लाख रुपयांनी कमी केल्या आहेत. त्याबाबत अर्जदारांनाही कळविले आहे. परंतु, निर्णय होऊन एक महिना झाला तरी ग्राहक संबंधित कार्यालयाकडे फिरकताना दिसत नाहीत. त्यामुळे सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अर्जदारांसाठी सिडकोने उलवे येथील बामणडोंगरी रेल्वे स्थानक परिसरात दोन वर्षांपूर्वी गृहयोजना जाहीर केली होती. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली. त्यात ४,८६९ अर्जदार विजेते ठरले होते. सिडकोने या प्रकल्पातील घरांची किमत ३५ लाख ३० हजार रुपये इतकी निश्चित केली होती. ती अधिक असल्याची ओरड करून यशस्वी ग्राहकांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले होते. त्यामुळे संबंधित गृहयोजनेची संपूर्ण प्रक्रिया रखडली होती. ही बाब लक्षात घेऊन २९ जानेवारी २०२४ रोजी शिंदे यांच्या निर्देशानुसार सिडकोने या घरांच्या किमती सहा लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेतला.
घरांची आता किंमत २७ लाख रुपये सिडकोने ही घरे मूळ ३५ लाख ३० हजारांवरून २९ लाख ५० हजार या किमतीत उपलब्ध केली आहेत. त्याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या अडीच लाख रुपये अनुदानामुळे यशस्वी अर्जदारांना ही घरे केवळ २७ लाखांत उपलब्ध होणार आहेत.
या निर्णयाचे अयशस्वी अर्जदारांकडून स्वागत होईल, असे आडाखे सिडकोकडून बांधले जात होते. प्रत्यक्षात मात्र सिडकोचा हा अंदाज फोल ठरताना दिसत आहे. कारण निर्णय होऊन महिना उलटला तरी यशस्वी अर्जदार घरे घेण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. त्यासाठी आतापर्यंत पुढे आलेल्या ग्राहकांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याने सिडकोची डोकेदुखी वाढल्याची माहिती या विभागातील सूत्रांनी दिली.