नवी मुंबई : सानपाडा येथील एकाच इमारतीमधील चार कार्यालयांमध्ये चोरीची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या घटनेत रोख रकमेसह मौल्यवान वस्तू व विदेशी चलन असा लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे. त्याठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा फिरवून अज्ञात दोघांनी एकाच रात्रीत चार कार्यालयांमध्ये चोरी केली.सानपाडा सेक्टर ११ (जुईनगर) येथील नाल्यालगतच असलेल्या एलोरा फेस्टा या १३ मजली इमारतीमधील चार कार्यालयांत घरफोडी झाली आहे. ही इमारत कमर्शियल असून त्यामध्ये अनेक व्यावसायिकांची कार्यालये आहेत. शुक्रवारी रात्री दोघा अज्ञातांनी तोंडावर मास्क घालून इमारतीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर इमारतीमधील सीसीटीव्हीचे तोंड भिंतीकडे फिरवून चार कार्यालयांमध्ये चोरी केली. त्यामध्ये एक कार्यालय ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे आहे, तर इतर सॉफ्टवेअर कंपनीची आहेत. बंद कार्यालयांच्या खिडकीचे स्लायडिंग तोडून आत प्रवेश केल्यानंतर दोघांनीही तोंडावर मास्क घातलेले होते. या दोघांनी ४ लाख रुपयांची रक्कम, थायलंडचे चलन व महागड्या वस्तू असा लाखोंचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच इमारतीमध्ये एकाच रात्रीत चार कार्यालयांमध्ये झालेल्या चोरीच्या प्रकारामुळे पोलिसांच्या रात्रगस्तेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच तुर्भे पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच चोरीची घटना घडली होती. त्यानंतर एकाच इमारतीत चार कार्यालयांत झालेल्या चोरीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
एकाच इमारतीतील चार कार्यालयांत चोरी
By admin | Published: August 23, 2015 3:47 AM