कुत्र्यांच्या पाठोपाठ मांजरांचे निर्बिजीकरण; पनवेल महानगरपालिकेच्या भटक्या मांजराचे लसीकरण व निर्बिजीकरण केंद्राचे उद्घाटन
By वैभव गायकर | Published: June 23, 2023 06:31 PM2023-06-23T18:31:37+5:302023-06-23T18:31:49+5:30
कुत्र्यांचे निर्बिजीकरण आपण ऐकतो मात्र मांजरांचे देखील निर्बिजीकरण आणि लसीकरण केंद्र पनवेल महानगरपालिकेने सुरु केले आहे.
पनवेल : कुत्र्यांचे निर्बिजीकरण आपण ऐकतो मात्र मांजरांचे देखील निर्बिजीकरण आणि लसीकरण केंद्र पनवेल महानगरपालिकेने सुरु केले आहे. पनवेल शहरातील हे केंद्र पोदी येथे श्वान नियंत्रण केंद्राच्या वरील मजल्यावरती सुरु करण्यात आले असुन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, पशुधन वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान गीते, मुख्य सर्जन डॉ. हनुमान घनवट , प्रभाग अधिकारी रोशन माळी ,आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, अरूण कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.भटक्या मांजराच्या संख्येवर नियंत्रण आणणेकरिता भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जसा नसबंदी कार्यक्रम राबविण्यात येतो, त्याच धर्तीवर भटक्या माजंरासाठी नसबंदी कायदा राबविण्याच्या ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्या सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या, त्याप्रमाणे इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स ,इंडिया संस्थेच्या माध्यमातून महापालिकेने भटक्या मांजराचे लसीकरण व निर्बिजीकरण केंद्र सरू केले आहे.या केंद्रामध्ये पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील भटक्या मांजरी तसेच भटक्या मांजरींचे लसीकरण व निर्बिजीकरण करण्यात येत आहे.
वर्षाला सरासरी 300 मांजरींचे लसीकरण व निर्बिजीकरण व 200 आजरी मांजरींवर औषधोपचार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या या केंद्रावरती दर मंगळवार, गुरूवार, शनिवार मांजरीचे 9 ते 5 यावेळेत लसीकरण व निर्बिजीकरण करण्यात येणार आहे.महापालिकेकडे या केंद्राकडे चार रूग्णवाहिका असून महापालिकेतील या वाहिकेच्यामाध्यमातून भटके कुत्रे व भटके मांजर पकडण्यात येणार आहे.पनवेल महानगरपालिकेत एक हजार मोकाट मांजरी असल्याचा अंदाज पालिकेने बांधला आहे.
राज्यातील दुसरी महानगरपालिका -
कुत्र्यांच्या पाठोपाठ मांजरांचे निर्बिजीकरण तसेच लसीकरण करणारी यंत्रणा मुंबई महानगरपालिकेने सुरु केली आहे.त्या पाठोपाठ पनवेल महानगरपालिकेचा क्रमांक लागत आहे.राज्यात केवळ दोनच महानगरपालिककेत हे केंद्र सुरु आहेत.