भंगार वेचणाऱ्याची अज्ञाताकडून हत्या
By admin | Published: February 16, 2017 02:17 AM2017-02-16T02:17:44+5:302017-02-16T02:17:44+5:30
एपीएमसी आवारात भंगार वेचणाऱ्या व्यक्तीचा तुर्भे एमआयडीसी परिसरात मृतदेह आढळून आला आहे. तो मानखुर्दचा राहणारा
नवी मुंबई : एपीएमसी आवारात भंगार वेचणाऱ्या व्यक्तीचा तुर्भे एमआयडीसी परिसरात मृतदेह आढळून आला आहे. तो मानखुर्दचा राहणारा असून घटनेच्या दोन दिवस अगोदरपासून बेपत्ता होता. त्याच्या हत्येप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हासीम गुजराती (४०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो मानखुर्दचा राहणारा असून एपीएमसी मार्केट आवारात भंगार वेचण्याचे काम करायचा. रिकामी खोकी अथवा उपयोगी वस्तू जमा करुन तो विकायचा. यासाठी दररोज तो पत्नी व मेहुण्यासोबत एपीएसी आवारात भंगार वेचण्यासाठी येत असे. रविवारी देखील तो नेहमीप्रमाणे आला असता, तिथून भिवंडीला जाण्याच्या कारणावरुन पत्नी व मेहुण्याला एपीएमसीमध्ये सोडून गेला होता. परंतु यानंतर तो घरी परत आलेला नव्हता. अशातच मंगळवारी तुर्भे एमआयडीसी परिसरातील विशाल हॉटेललगतच्या मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत त्याठिकाणी पडल्याचे एका केबल कर्मचाऱ्याला दिसले. त्याने पोलिसांना कळवले असता शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला होता. यावेळी त्याच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याचे आढळून आले. तर त्याच्या खिशात आढळलेल्या आधार कार्डद्वारे बिहार पोलिसांच्या मदतीने त्याची ओळख पटवली. (प्रतिनिधी)