लोह बोर्डाची रक्कम लुबाडणाऱ्यांना अटक
By admin | Published: February 22, 2017 06:56 AM2017-02-22T06:56:44+5:302017-02-22T06:56:44+5:30
लोह बोर्डाची बँकेतील ठेवीची रक्कम हडप करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने
नवी मुंबई : लोह बोर्डाची बँकेतील ठेवीची रक्कम हडप करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने अटक केली आहे. त्यांनी २०१४ मध्ये बनावट खात्याद्वारे बोर्डाचे अडीच कोटी रुपये हडप केले होते. ही बाब सप्टेंबर २०१६ मध्ये निदर्शनास आल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बॉम्बे आयर्न अॅण्ड स्टील लेबर बोर्ड (लोह बोर्ड)ची व बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक शाखेच्या कक्ष दोनने चौघांना अटक केली आहे. महेश उतेकर, राजेंद्र शेळके, पद्माकर चव्हाण व प्रभाकर मुसळी अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी कळंबोली येथील आंध्रा बँकेत लोह बोर्डाच्या नावे बनावट खाते उघडले होते. त्यानंतर बोर्डाची बनावट कागदपत्रे तयार करून उमेश टोले नावाच्या व्यक्तीला बोर्डाचे अधिकार भासवून ठेवीचे अडीच कोटी रुपये बनावट खात्यामध्ये जमा केले. यानंतर त्यांनी ही रक्कम काढून घेऊन पोबारा केला होता; परंतु २०१४मध्ये घडलेला हा प्रकार २०१६मध्ये बोर्डाच्या निदर्शनास आला. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांकडे अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने तपासाला सुरुवात केली होती. त्यानुसार पाच महिन्यांच्या तपासाअंती चौघांना अटक करण्यात यश आल्याचे पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांनी सांगितले. त्याकरिता तपास पथकाला बनावट बँक खात्यापासून तपासाला सुरुवात करावी लागली. यादरम्यान बोर्डाच्या नावे बनावट बँक खाते उघडण्यासाठी वापरलेले नाव व छायाचित्र भिन्न असल्याचे समोर आले. मात्र, अधिक सखोल तपासात ते छायाचित्र महेश उतेकर याचे असल्याचे उघड झाले. यामुळे त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले असता, संपूर्ण प्रकार उघडकीस आला. उतेकर हा चालक असून त्याने रियल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या इतर तिघांच्या मदतीने हा अपहार केला होता. बोर्डाची ठेवीची रक्कम ही माथाडी कामगारांशी संबंधित होती; परंतु या चौघांपैकी कोणीही माथाडी कामगार किंवा बोर्डाशी संबंधित नाही. तरीही त्यांना लोह बोर्डाच्या ठेवीची माहिती मिळाली कुठून याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही. शिवाय, ज्या बँकेत बोर्डाची ठेवीची रक्कम होती, त्याच बँकेच्या एकाच शाखेत बोर्डाच्या नावे बनावट खाते त्यांनी उघडले होते. त्यामुळे या प्रकरणात इतरही कोणाचा समावेश आहे का? याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पाच महिन्यांच्या तपासाअंती चौघांना अटक करण्यात यश आल्याचे पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांनी सांगितले. त्याकरिता तपास पथकाला बनावट बँक खात्यापासून तपासाला सुरुवात करावी लागली.
यादरम्यान बोर्डाच्या नावे बनावट बँक खाते उघडण्यासाठी वापरलेले नाव व छायाचित्र भिन्न असल्याचे समोर आले.