नवी मुंबई : नेरूळ येथे रस्त्यालगत आढळलेल्या बेवारस बॅगमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचा संशय आल्याने बॉम्बशोधक पथकामार्फत तिची झडती घेण्यात आली. अखेर सापडलेली ही बॅग एपीएमसीमधून चोरीला गेलेली असल्याचे स्पष्ट झाले.नेरूळ येथील डी. वाय. पाटील कॉलेजसमोरील दुकानाबाहेर रस्त्यालगत बेवारस बॅग पडली होती. दुकानदाराला संशय असल्याचे त्याने संध्याकाळी ५.३०च्या सुमारास नेरुळ पोलिसांना कळवले. बॉम्बशोधक व निकामी पथक घटनास्थळी दाखल झाले. यादरम्यान बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान, बीडीडीएसने बॅगची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये केवळ कागदपत्रे आढळली. सुरेंद्र लोहाट (४९) यांची ही बॅग असल्याने पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ती बॅग एपीएमसीमधून चोरीला गेली होती असे समजले. मंगळवारी सकाळी लोहाट एपीएमसीमध्ये आले होते. जलाराम मार्केटलगत पार्क केलेल्या कारमध्ये त्यांचा मुलगा बसला होता. तेव्हाच बॅग चोरीला गेली होती. एका व्यक्तीने लक्ष विचलित करून ही बॅग पळवली. यासंबंधीची तक्रार देखील त्यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात केली होती. मात्र चोरलेल्या बॅगमध्ये पैसे मिळाल्याने चोरट्याने ती नेरुळ येथे रस्त्यालगत टाकली होती, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी दिली. (प्रतिनिधी)
चोरीला गेलेल्या बॅगने उडवली खळबळ
By admin | Published: August 05, 2015 12:11 AM