चोरीला गेलेले ३ कोटी ७५ लाख रुपयांचे दागिने वर्षभरात हस्तगत, ३५ लाखांचे दागिने परत; ३१ कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 03:28 AM2021-04-03T03:28:17+5:302021-04-03T03:29:10+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यस्त असतानाही, वर्षभरात पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात ३१ जणांना ३५ लाखांचे दागिने परत दिले असून, उर्वरितांना दागिने परत देणार आहेत.
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यस्त असतानाही, वर्षभरात पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात ३१ जणांना ३५ लाखांचे दागिने परत दिले असून, उर्वरितांना दागिने परत देणार आहेत.
परिमंडळ एक अंतर्गत फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी वाशीमधील मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. आयुक्त बिपीनकुमार सिंग, उपआयुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त विनायक वस्त, भरत गाडे व सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीसही व्यस्त होते. ८० टक्के पोलीस दलच कार्यरत होते. मनुष्यबळ कमी असताना व बंदोबस्ताचा ताण असतानाही पोलिसांनी चोरी, घरफोडी व इतर गुन्ह्यांमधील ३ कोटी ७५ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
जप्त केलेले दागिने परत करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून शुक्रवारी त्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे गर्दी होऊ नये, यासाठी ३१ नागरिकांना बोलावून त्यांना त्यांचे ३५ लाख रुपयांचे दागिने परत केले आहेत. उर्वरित नागरिकांनाही कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने त्यांचे दागिने परत केले जाणार आहेत.