- योगेश पिंगळे
नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईला मागणी वाढते. तसेच या काळात पनीर आणि खव्यामध्ये देखील भेसळ होण्याची शक्यता देखील अधिक असते. पनीर आणि खवा खाल्यावर पोटाचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे या काळात काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एकमेकांना भेट म्हणून गोड पदार्थ तसेच भेटवस्तू दिल्या जातात. त्यामुळे दिवाळीच्या सणाला मिठाईला प्रचंड मागणी असते. दिवाळीच्या निमित्ताने मिठाई, कंदील, रांगोळ्यांनी बाजारपेठा फुलून जातात. खरेदीची लगबग सुरू होते. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई किंवा गोड पदार्थ घरोघरी विकत आणले जातात. अशावेळी पदार्थांमध्ये भेसळयुक्त पदार्थ आपण न पाहता घेतले तर त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
अधिक नफा कमविण्यासाठी मिठाई, दूध किंवा पनीरमध्ये भेसळ करतात. बऱ्याचवेळा दुधामध्ये युरिया मिसळल्याचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत. सणांमध्ये वाढलेली मागणी आणि मिळणारा नफा या दोन्हीचा विचार करून व्यापारी अशा प्रकारे भेसळ होण्याची शक्यता असते त्यामुळे बाजारातून वस्तू घेताना ग्राहकांनी मात्र सतर्क राहणे आवश्यक आहे, अन्यथा ते जीवावरही बेतू शकते. त्यामुळे या काळात काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
दुधाच्या उत्पादनांमध्ये भेसळदूध आणि दुधापासून बनवलेल्या उत्पादनांममध्ये पनीर, खवा, रबडी, गोड दही इत्यादी साफ आणि शुद्ध दिसण्यासाठी अनेक पदार्थ मिसळले जातात. या भेसळीमुळे विविध शारीरिक आजारांना सामोरे जावे लागू शकते.
घरीच ओळखा भेसळअस्सल पनीर लोण्यासारखे मुलायम असते. भेसळयुक्त पनीर खूप घट्ट, चिवट असू शकते. भेसळयुक्त पनीर तोडण्यासाठी खेचावे लागते. बाहेरून आणलेले पनीर पाण्यात उकळून थंड करावे. थंड झाल्यानंतर त्यातल्या एका तुकड्यावर आयोडीन टिंचरचे काही थेंब घालावेत. त्यानंतर पनीरचा रंग निळा झाला, तर ते पनीर भेसळयुक्त असल्याचे निष्पन्न होते.
वाढू शकतात पोटाचा विकारभेसळयुक्त पनीर, खवा यासारखे पदार्थ खाल्ले गेल्याने एकप्रकारे विषबाधाच होते. याचे शरीरावर पित्त, गॅसेस याबरोबरच पोटात मळमळणे, जुलाब आदी त्रास होऊ शकतो. दिवाळीच्या काळात मिठाईला जास्त मागणी असल्याने पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. - डॉ. शरीफ तडवी, चेस्ट फिजिशियन