मधुकर ठाकूरउरण : उरण शहरातून गणपतीचे दर्शन घेऊन खोपटा- द्रोणागिरी मार्गाने जात असताना काही अज्ञात समाजकंटकांनी राष्ट्रवादी राज्य प्रदेश महिला संघटनेच्या सरचिटणीस भावना घाणेकर यांच्यावर गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. पाऊस व रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत ही दगडफेक करण्यात आली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी गाडीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी उरण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी राज्य प्रदेश महिला संघटनेच्या सरचिटणीस भावना घाणेकर बुधवारी (१४ ) संध्याकाळच्या सुमारास उरण शहरातील सातरहाटी, कामठा येथील गणपतीचे दर्शन घेऊन इनोव्हा गाडीने वाशीकडे निघाल्या होत्या. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास खोपटा- द्रोणागिरी मार्गाने जात असताना कोसळणाऱ्या जोरदार पाऊस व अंधाराचा फायदा घेत काही समाजकंटक, गुंडांनी गाडीच्या मागून दगड फेक केली. या दगडफेकीत काचा फुटून गाडीचे नुकसान झाले आहे. वाहन चालकानेही प्रसंगावधान राखून गाडी वेगाने पुढे नेली. यामुळे सुदैवाने कोणतीही शारीरिक इजा झाली नाही.
दरम्यान, या नरस्त्यावर रात्रीच्या वेळी फारशी रहदारी नसते. शिवाय दुतर्फा रस्त्यावरही अद्यापही लाईटची, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे या गंभीर घटनेचा तपास सध्या तरी पोलिसांसाठी एक प्रकारे आव्हान ठरले आहे. घटनास्थळी डीसीपी शिवराज पाटील, एसीपी धनाजी क्षीरसागर, उरण वपोनि सुनील पाटील आणि सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र पोलिसांना तपास कामी मदत मिळेल दगडधोंड्यांशिवाय असा अद्यापही एकही धागा हाती लागलेला नाही. या गंभीर घटनेबाबत मात्र परिसरातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी भावना घाणेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी प्रकाश पवार अधिक तपास करीत आहेत.