मंदिरांवरील कारवाई थांबवा
By admin | Published: February 16, 2017 02:21 AM2017-02-16T02:21:16+5:302017-02-16T02:21:16+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडको, एमआयडीसी व महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे.
नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडको, एमआयडीसी व महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. वारकरी संप्रदायाने या कारवाईबद्दल खेद प्रकट केला आहे. शहरातील मंदिरांवर सुरू असलेली ही कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना साकडे घातले आहे.
सुनियोजित नवी मुंबई शहरात बेकायदा धार्मिक स्थळांचे पेव फुटले आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात २00९ नंतर उभारलेल्या बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने संबंधित प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापालिका, सिडको आणि एमआयडीसीने बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत अनेक धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील वारकरी संप्रदाय दुखावला गेला आहे. मंदिरांवरील ही कारवाई थांबवावी, अटी व शर्तीचे बंधन घालून ही मंदिरे नियमित करावीत, अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वारकरी संप्रदायाच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेतली. त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. ही कारवाई थांबविण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्याची गळ घातली.
दरम्यान, धार्मिक स्थळांवरील कारवाई थांबविण्यासाठी आपला शासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांचीशीही आपण यासंदर्भात चर्चा केली आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील कारवाई नक्कीच थांबविली जाईल, असे आश्वासन आमदार म्हात्रे यांनी या शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात श्री नागाई सामाजिक सेवा ट्रस्ट, संत जगद्गुरू तुकाराम महाराज वारकरी मंडळ, संत ज्ञानेश्वर माउली वारकरी मंडळ, विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, हिंदू जनजागृती समिती व शिव प्रतिष्ठान आदींच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
(प्रतिनिधी)