बांधकामांवरील कारवाई थांबवा
By admin | Published: August 22, 2015 12:08 AM2015-08-22T00:08:39+5:302015-08-22T00:08:39+5:30
दिघा घर बचाव संघर्ष समितीने एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढून अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्याची मागणी केली.
नवी मुंबई : दिघा घर बचाव संघर्ष समितीने एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढून अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्याची मागणी केली. आधी इमारती बांधणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही करण्यात आली.
औद्योगिक वसाहतीच्या जागेवर दिघा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींविषयी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यानंतर एमआयडीसी प्रशासनाने जवळपास ९० इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा दिल्या आहेत. रहिवाशांनी दिघा घर बचाव संघर्ष समिती स्थापन केली असून शुक्रवारी एमआयडीसीच्या महापेमधील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चार हजारपेक्षा जास्त नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. एमआयडीसीने इमारतींचे बांधकाम सुरू असताना त्यांच्यावर कारवाई का केली नाही, इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर व तेथील घरे सामान्य नागरिकांनी आयुष्याची कमाई खर्च करून घेतल्यानंतर कारवाई का केली जात आहे, असा सवाल करण्यात आला. महापेतील सभेमध्ये आमदार संदीप नाईक यांनी आंदोलकांशी संवाद साधला.