नवी मुंबई : गाव गावठाणात उभारलेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सिडकोने धडक कारवाई हाती घेतली आहे. नवी मुंबईसह पनवेल तालुक्यातील जवळपास आठशे बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी कृती समितीच्या माध्यमातून मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालून ही कारवाई थांबविण्याची विनंती केली.प्रकल्पग्रस्तांच्या २०१२ पर्यंतच्या बांधकामांनाच अभय देण्यात आले आहे. तरीही अनधिकृत बांधकामांचा धडका सुरूच आहे. त्यामुळे सिडकोने ८ मे पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. ८००पेक्षा अधिक बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत. याला प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील आदींनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्याची विनंती केली. सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मनोहर पाटील यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात उद्या दिवा कोळीवाडा येथे बैठक होणार आहे. दरम्यान, आमदार मंदा म्हात्रे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारवाई रोखण्याची मागणी केल्याचे समजते....अन्यथा आंदोलन!च्गाव गावठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाईसंदर्भात पाठविण्यात आलेल्या नोटिसा रद्द कराव्यात, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिला आहे. च्राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता क्लस्टर योजना मंजूर केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेल्या बांधकामांना सिडकोने नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा परत घेऊन सर्वसमावेशक हिताची योजना तयार करा, अशी मागणीही नाईक यांनी या केली आहे. च्दरम्यान, त्यांनी बुधवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांचीही भेट घेऊन या नोटिसा मागे घेण्याची विनंती केली आहे.
बांधकामांवरील कारवाई थांबवा
By admin | Published: May 07, 2015 12:30 AM