महानगरपालिकेतील प्रतिनियुक्तीचे लोंढे थांबवा; श्रमिक सेनेची आयुक्तांकडे मागणी
By नामदेव मोरे | Published: February 2, 2024 06:59 PM2024-02-02T18:59:55+5:302024-02-02T19:00:11+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बहुतांश प्रमुख पदांवर प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे. उपायुक्तपदाची ११ पदे आहेत.
नवी मुंबई : महानगरपालिकेमध्ये शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अनेक अधिकारी पाठविले जात आहेत. यासाठी नियमांचेही उल्लंघन केले जात आहे. प्रतिनियुक्तीचे लोंढे थांबविण्यात यावेत, अशी मागणी श्रमिक सेनेने केली असून संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक यांच्या सहीचे पत्र आयुक्तांना देण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बहुतांश प्रमुख पदांवर प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे. उपायुक्तपदाची ११ पदे आहेत. यापैकी ६ पदांवर मनपाच्या सेवेतील अधिकाऱ्यांची वर्णी लागणे आवश्यक आहे; परंतु सद्य:स्थितीमध्ये सर्व पदांवर प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे. सहायक आयुक्तपदावरही शासनाकडील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. नगरचना, लेखा विभागामध्येही प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आहेत. श्रमिक सेनेने याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांचा कार्यकाळ संपला आहे त्यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी केली आहे. अशा आशयाचे पत्र अध्यक्ष संजीव नाईक यांच्या सहीने आयुक्त राजेश नार्वेकर यांना देण्यात आले आहे.
श्रमिक सेनेचे सरचिटणीस चरण जाधव, विजय साळे, राजुसिंग चव्हाण, राम चव्हाण, सुनील गावित, सुनील राठोड, कल्पना राणे, राकेश आंबेकर, अभिजित वसावे, रूपाली कुमावत, अभिवन साेळंके, महादेव गावडे यांनी हे पत्र आयुक्तांकडे दिले असून योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे.