पेण रेल्वेस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवा
By admin | Published: June 21, 2017 05:44 AM2017-06-21T05:44:50+5:302017-06-21T05:44:50+5:30
एप्रिल २०१५पासून पेण-पनवेल-पेण, तर एप्रिल २०१७पासून पनवेल-रोहा-पनवेल, अशा रेल्वे गाड्या सुरू होणार होत्या. ३१ मार्च २०१५ रोजी पेण-पनवेल-पेण हा दुहेरी मार्ग तयार आहे,
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : एप्रिल २०१५पासून पेण-पनवेल-पेण, तर एप्रिल २०१७पासून पनवेल-रोहा-पनवेल, अशा रेल्वे गाड्या सुरू होणार होत्या. ३१ मार्च २०१५ रोजी पेण-पनवेल-पेण हा दुहेरी मार्ग तयार आहे, असा फलक पेण रेल्वे प्रशासनाने अधिकृतरीत्या गेल्या वर्षीच लावला आहे. असे असताना रेल्वे प्रशासन नेमकी कसली वाट पाहत आहे, असा प्रश्न करत पेण-पनवेल-पेण या मार्गावरून नव्या प्रवासी गाड्या सुरू करण्याची मागणी निसर्ग फ्रेंडशिप असोसिएशन कोकण आणि मित्र स्वयंसेवी संस्थेने पेण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
सध्या पेण रेल्वेस्थानकात दादर-रत्नागिरी, दिवा-मडगाव, दिवा-रोहा या प्रवासी गाड्यांनाच थांबा आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या गाड्या या ठिकाणी थांबत नाहीत. पेण-पनवेल दुपदरीकरणाचा मार्ग पूर्ण होऊनही पेण येथून नव्या गाड्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे पेणवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पेण हे ठिकाण मुंबईला अंत्यत जवळ आणि रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी खरेदी-विक्र ीसाठी, पर्यटनासाठी देशातूनच नाही, तर जगभरातून लोक जा-ये करत असतात. याच पेण परिसरात गणपतीचे हजारो कारखाने आहेत, त्यामुळे पेणला गणपती मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. गणेश मूर्तींसह पेणमध्ये विविध प्रकारची ताजी भाजी, ओली व सुकी मासळी, पापड, पोहे अशा व इतर अनेक वस्तू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि किफायतशीर भावात उपलब्ध असतात. पेण-खोपोली रस्त्यावर मोठी औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे दळणवळणासाठी रेल्वेसारखे साधन या ठिकाणी खूप महत्त्वाचे ठरते.
पेणवरून सुरू होणाऱ्या प्रवासी रेल्वेचा फायदा रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, मुरु ड, रोहा, पनवेल, उरण, खालापूर, पाली, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन महाड, पोलादपूर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमधील जनतेला होणार आहे. पेणवरून नव्या गाड्या सुरू करण्यासंदर्भात सह्यांची मोहीम हाती घेण्यात येत असल्याची माहिती निसर्ग फ्रेंडशिप असोसिएशन कोकणचे अध्यक्ष योगेश शशिकांत म्हात्रे यांनी दिली.