पाण्याची पळवापळवी थांबवून नवी मुंबईकरांची तहान भागवा: अधिकाऱ्यांना मडके भेट देऊन केला निषेध

By नामदेव मोरे | Published: August 18, 2023 07:29 PM2023-08-18T19:29:23+5:302023-08-18T19:29:31+5:30

हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

stop thirst of Navi Mumbaikars by stopping water stealing: protested by gifting pots to officials | पाण्याची पळवापळवी थांबवून नवी मुंबईकरांची तहान भागवा: अधिकाऱ्यांना मडके भेट देऊन केला निषेध

पाण्याची पळवापळवी थांबवून नवी मुंबईकरांची तहान भागवा: अधिकाऱ्यांना मडके भेट देऊन केला निषेध

googlenewsNext

नवी मुंबई: महानगरपालिका क्षेत्रात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली असताना नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी इतर शहरांना दिले जात आहे. मोरबे धरणास, एमआयडीसीतील पाणी इतर ठिकाणी वळविले जात आहे. पाण्याची ही पळवापळवी थांबवावी व सर्वप्रथम नवी मुंबईकरांची तहान भागवावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी दिला आहे. अधिकाऱ्यांना मडका भेट देवून पाणी टंचाईचा निषेध व्यक्त केला.

नेरूळसह शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असताना व २४ तास पाणी पुरवठा करण्याचा दावा केला जात असतानाही प्रत्यक्षात आवश्यक तेवढेही पाणी उपलब्ध होत नाही. नेरूळ विभागामध्येही वेळेत पाणी पुरवठा हाेत नाही. अनेकवेळा गढूळ पाणी येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. भाजपाचे माजी नगरसेवक सुूरज पाटील यांनी अतिरिक्त शहर अभियंता सूरज पाटील यांची भेट घेऊन त्यांना मडके भेट देवून पाणी टंचाईचा निषेध व्यक्त केला. शहरातील प्रत्येक नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी केली.

नवी मुंबईला बारवी धरणातून एमआयडीसीच्या माध्यमातून १६० एमएलडी पाणी मिळणे आवश्यक आहे. परंतु त्यामधीलही ८० एमएलडीच पाण्याचा कोटा ठेवला आहे. हा कोटाही पूर्ण मिळत नसून मनपाला फक्त ४० ते ४५ एमएलडी एवढेच पाणी मिळत आहे. नवी मुंबईच्या हक्काचे पाणी इतर शहरांकडे वळविण्यात येत आहे. मोरबे धरणातील पाणीही खारघर, कामोठे, कळंबोली परिसराला दिले जात आहे. शहरवासी तहानलेले असताना दुसऱ्या शहरांची तहान भागविण्याची जबाबदारी का घेतली जात आहे असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

इतर शहरांचे पाणी थांबवा अन्यथा आंदोलन

नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी नवी मुंबईलाच मिळाले पाहिजे. मोरबे धरणाचे पाणी खारघर ते कळंबोली पर्यंतच्या परिसराला जात आहे. जीवनप्राधीकरणाचे एमआयडीसीच्या माध्यमातून मिळणारे नवी मुंबईच्या हक्काचे पाणी इतर शहरांकडे वळविणे तत्काळ थांबवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

नवी मुंबईमधील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मोरबे धरणातील सर्व पाणी मनपा क्षेत्रासाठी वापरावे व एमआयडीसीकडून कराराप्रमाणे ठरलेला साठा मिळवावा. हक्काचे पाणी पळविण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांना मडके दिले आहे.-सूरज पाटील, माजी नगरसेवक, नेरूळ

Web Title: stop thirst of Navi Mumbaikars by stopping water stealing: protested by gifting pots to officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.