पनवेल : शहरात अनेक ठिकाणी वाहनांच्या दुरुस्तीची कामे रस्त्यावर तसेच पदपथावर केली जातात, त्यामुळे वाहतूककोंडी होते, तसेच नागरिकांचीही गैरसोय होते. दुरुस्ती करताना तसेच गाड्यांचे स्पेअर पार्ट दुकानांसमोर ठेवण्यात येतात. या ठिकाणी स्वच्छता राखली जात नसल्याने परिसर विद्रूप होतो. यासंदर्भात सूचना देण्यासाठी गॅरेज व्यावसायिकांसोबत नुकतीच सभागृह नेते व पालिका उपायुक्तांनी बैठक घेतली.पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘ड’मधील सर्व गॅरेज आणि स्पेअर पार्ट दुकानाचे मालक, चालक, फिटर, मेकॅनिक यांची बैठक सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपायुक्त जमीर लेंगरेकर व प्रभाग समिती ‘ड’ अध्यक्ष तेजस कांडपिळे, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांच्या उपस्थितीत झाली. अनेक ठिकाणी रस्त्याला लागूनच चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे गॅरेज आहेत. या ठिकाणी दुरुस्तीसाठी येणारी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात आणि पदपथावर कामे केली जातात. त्यामुळे पदपथ आणि रस्ता दोन्ही ठिकाणी अडवणूक होऊन परिसरात वाहतूककोंडी होते. शिवाय ग्रीस, आॅइलमुळे परिसर काळवंडतो. त्यामुळे गॅरेजमध्ये आलेली वाहने रस्ता किंवा पदपथावर उभी न करता, दुकानाच्या आवारात इतरांना त्रास होणार नाही, अशा ठिकाणी ठेवण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले. गॅरेजमध्ये कचरापेटी ठेवून त्यात कचरा टाकावा व स्वच्छता राखावी, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या. पुढच्या काळात वाहन दुरुस्ती सार्वजनिक जागेत करू नये, व हाउसिंग सोसायटीच्या आवारात दुरुस्तीची कामे करताना संबंधित सोसायटीची परवानगी घ्यावी, व्यवसायासाठी सरकारी मालमत्तेचा वापर न करता स्वत:च्या जागेत व्यवसाय करावा व ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत जागेची व्यवस्था करावी, असेही निर्देश या वेळी देण्यात आले. बैठकीत गॅरेज स्पेअर पाटर््स दुकानचालकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली.वाहनांची दुरुस्ती करताना नागरिकांना त्रास होऊ नये आणि परिसरात स्वच्छता राहावी, या अनुषंगाने ही बैठक झाली. बैठकीतून समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार समन्वय राखला जाणार असून याचा फायदा नागरिक आणि गॅरेजचालकांना होईल.- परेश ठाकूर, सभागृहनेते, पमपा.