वडखळ : जेएसडब्लू कंपनीत येथील स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी, या परिसरातील गावांना कंपनीमार्फत शुध्द मोफत पाणीपुरवठा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीविरोधात परिसरातील ४२ गावातील ग्रामस्थांनी मुंबई- गोवा महामार्गावर गडब येथील कांळबादेवी मंदीरासमोर रास्ता रोको केला.परिसरातील जनतेच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे माजी रायगड जिल्हा प्रमुख विष्णू पाटील यांनी गुरुवारपासून (१४ जानेवारी) बेमुदत उपोषण सुरु केले होते मात्र कंपनी व्यवस्थापन व सरकारकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने विष्णू पाटील यांनी बुधवारी (२० जानेवारी) १.३० वाजता मुंबई- गोवा महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र रास्ता रोको करण्यापूर्र्वीच सकाळी १० च्या सुमारास प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून विष्णू पाटील यांना वडखळ पोलिसांनी ताब्यात घेवून पेण न्यायालयात हजर केले. विष्णू पाटील यांना अटक केल्याचे समजताच खारपाले, कासू, पांडापूर, पाटणी, अमटेम, गडब, कोलटी आदी ४२ गावातील ग्रामस्थांनी ठरल्याप्रमाणे रास्ता रोको केला.जेएसडब्ल्यू व्यवस्थापनाने विष्णू पाटील यांच्यासह शिष्टमंडळाला मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन यापूर्वी दिले होते परंतु कंपनी व्यवस्थापनाने या मागण्यांची पूर्तता न केल्याने शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विष्णू पाटील यांनी वरील मागण्या पूर्ण करण्यासाठी १४ जानेवारीपासून कंपनीच्या गोवा गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते परंतु प्रशासन कंपनी व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विष्णू पाटील यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. (वार्ताहर)
जेएसडब्लू कंपनीविरोधात रास्ता रोको
By admin | Published: January 21, 2016 2:45 AM