घणसोली सेंट्रल पार्कचे काम रोखले
By Admin | Published: June 17, 2016 01:01 AM2016-06-17T01:01:34+5:302016-06-17T01:01:34+5:30
भूखंडाचे महापालिकेकडे हस्तांतरण झालेले नसतानाही, त्यावर सुरू केलेल्या सेंट्रल पार्कच्या कामाला पालिका आयुक्तांनी लाल झेंडा दाखवला आहे. सत्ताधाऱ्यांची मर्जी सांभाळत महापालिका
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
भूखंडाचे महापालिकेकडे हस्तांतरण झालेले नसतानाही, त्यावर सुरू केलेल्या सेंट्रल पार्कच्या कामाला पालिका आयुक्तांनी लाल झेंडा दाखवला आहे. सत्ताधाऱ्यांची मर्जी सांभाळत महापालिका अधिकाऱ्यांनी टेंडर काढून पार्कच्या कामाला सुरवात केली होती. परंतु यानंतर सिडकोने भूखंडाचा काही भाग महापालिकेला विश्वासात न घेताच वगळल्याने पार्कच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते.
सेंट्रल पार्कच्या नावाखाली घणसोली सेक्टर ३ येथील सावली गाव हटवण्यात आले आहे. यानंतर त्याठिकाणच्या पात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी असतानाच पार्कचे देखील भवितव्य धोक्यात आले होते. पार्कसाठी राखीव ठेवलेल्या एकूण क्षेत्रफळातून भूखंडाचा काही भाग सिडकोने परस्पर वगळल्याने महापालिकेने भूखंड हस्तांतर करून घेण्यास नकार दिला होता. परंतु त्यापूर्वीच महापालिकेने ठेकेदारामार्फत सदर भूखंडावर पार्कच्या कामाला देखील सुरवात केलेली होती. आॅगस्ट २०१४ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांची मर्जी सांभाळत पालिका अधिकाऱ्यांनी भूखंड हस्तांतर झालेला नसतानाही निविदा काढण्यात आलेली होती. त्यामुळे सिडकोकडून महापालिकेची चांगलीच कोंडी झाली आहे. सेंट्रल पार्कसाठी ४४,१२४ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड आरक्षित असताना, त्यामधील ५८६४ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड वगळून उर्वरित भूखंडाचे हस्तांतरण करून घेण्याचे सिडकोने महापालिकेला सुचवले होते. प्रस्तावित पार्कच्या भूखंडातून वगळलेला हा भाग खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा सिडकोचा प्रयत्न असल्याची शक्यता आहे. परंतु संपूर्ण भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार प्रत्यक्षात कामाला सुरवात केलेली असल्यामुळे महापालिकेनेही अर्धवट भूखंड घेण्यास नकार दिलेला आहे. यामुळे घणसोलीतील सेंट्रल पार्कच्या भूखंडाचे हस्तांतरण अद्यापपर्यंत बैठकांपुरतेच मर्यादित राहिले आहे.
महापालिकेला सिडकोकडून केवळ आश्वासनच मिळालेले आहे. त्यापैकी काही बैठका तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली देखील झालेल्या आहेत. त्यानंतरही वगळलेले भूखंड रद्द करून संपूर्ण भूखंड महापालिकेकडे वर्ग झालेला नाही.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तूर्तास पार्कचे काम रोखले आहे. तो भूखंड अद्याप ताब्यातच आलेला नसल्यामुळे त्यावर ठेकेदारामार्फत महापालिकेचे सुरू असलेले काम त्यांनी थांबवले आहे.
महापालिकेकडे भूखंडाचे हस्तांतरण झालेले नसतानाही सेंट्रल पार्कचे काम सुरु असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. परंतु तत्कालीन आयुक्तांनी ही बाब गांभीर्याने न घेता गैरपध्दतीने सेंट्रल पार्कचे काम सुरुच ठेवले होते. परंतु हा प्रकार विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ काम थांबवले आहे. तसेच हा भूखंड लवकरात लवकर पालिकेला मिळावा यासाठीही प्रयत्न सुरु केले आहेत.
घणसोलीतील सेंट्रल पार्कचा भूखंड अद्याप महापालिकेला हस्तांतर झालेला नाही. यामुळे त्याठिकाणी सुरू असलेले काम थांबवण्यात आले आहे. तसेच वेळप्रसंगी त्या कामाचे ठेकेदाराचे कंत्राट देखील रद्द केले जाईल.
- तुकाराम मुंढे,
महापालिका आयुक्त.